हिमाचल प्रदेशात जुनी निवृत्तीवेतन योजना लागू ; महाराष्ट्रात कधी होणार ?

मुंबई – हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) सरकारने येत्या 1 एप्रिल पासून राज्यात जुनी निवृत्तीवेतन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याचा निर्णय काल घेतला. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू (CM Sukhvinder Singh Sukhu) यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या योजनेमुळे 1 कोटी 36 लाख कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर एक हजार कोटी रूपयांचा भार पडणार आहे.

नव्या निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना एक एप्रिलपासून जुनी योजना लागू करण्यात येईल असे, सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. यासाठी नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येतील. राज्याच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत 8 हजार कोटी रूपये परत करण्यासाठी केंद्र सरकारला (Central Govt) पाठवण्याचा ठरावही मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे.

इकडे महाराष्ट्रात (Maharashtra), राज्यातल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत सरकार नकारात्मक नाही, मात्र, भविष्याचा विचार करता यासाठी व्यवहार्य पर्याय देणं आवश्यक आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी काल राज्य विधान परिषदेत सांगितलं. जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यावर भावनिक न होता गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. ही जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करायची असेल तर आर्थिक ताळेबंद कसा राखायचा हा प्रश्न आहे. या प्रश्नावर व्यवहार्य तोडग्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर एक संपूर्ण दिवस राज्यातल्या मान्यताप्राप्त संघटनांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करणार असल्याचं फडणवीस म्हणाले.