…अन्यथा महाराष्ट्र पेटवून देऊ; उद्धव ठाकरेंचे चिथावणीखोर वक्तव्य 

Uddhav Thackeray :  उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज बारसू (Barsu) दौऱ्यावर आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी राजापूरमध्ये पोहोचल्यानंतर सोलगावात (Solgaon) रिफायनरी विरोधकांसोबत संवाद साधला. तर, ‘लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी प्रकल्प आणू नका.  हुकूमशाही लादू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटवून देऊ’ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारला दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले, जर नाणारला लोकांनी विरोध केला होता, तर बारसूत काय वेगळं करताय हे लोकांना दाखवा. रिफायनरीसाठी लोकांची डोकी फोडण्याचा हा घाट असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.

जर रिफायनरी येथे आणण्यास लोकांचा विरोध असेल तर तर ती आणू नका. रिफायनरी येता कामा नये. जे वादग्रस्त नाहीत ते सगळे प्रकल्प गुजरातला आणि वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारत आहेत. हे चालणार नाही. ही हुकूमशाही मोडून काढू. हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केलात तर महाराष्ट्र पेटवू असा इशाराही ठाकरेंनी दिला.