विरोधी पक्षांच्या एकजुटीमुळे व विरोधकांच्या वाढत्या लोकप्रियते मुळे भाजपच्या छावणीत घबराट ?

मुंबई  – आगामी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांची आखणी करण्यासाठी 26 विरोधी पक्षांची बंगळुरू येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. विरोधकांच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कट्टर भ्रष्टाचारांची बैठक असे संबोधन केल्या त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे असे म्हणाले विरोधी पक्षांच्या एकजुटीमुळे धर्मनिरपेक्ष शक्तींचे एकत्रीकरण व विरोधकांच्या वाढत्या लोकप्रियते मुळे भाजपच्या छावणीत घबराट पसरली आहे.

तपासे म्हणाले,  पंतप्रधानांना त्यांच्या सरकारची घसरलेली लोकप्रियता दिसत असल्यामुळे त्यांनी विरोधकांच्या बैठकीवर टीका केली. विरोधी पक्षांच्या बैठकी मुळे देशातील समस्त धर्मनिरपेक्ष शक्ती संविधानाच्या रक्षणासाठी भारतीय जनता पार्टी समोर एक मोठे आव्हान उभारणार हे भाजपच्या लक्षात आल्यामुळेच विरोधी पक्षातल्या आमदारांना फोडण्याची युक्ती वेगवेगळ्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी करत आहे.

बैठकीदरम्यान धर्मनिरपेक्ष शक्तींचे एकत्रीकरण 2024 च्या निवडणुकीत भाजपच्या सत्तेत येण्याच्या संभाव्यतेवर थेट परिणाम करणार आहे. संविधान रक्षणाच्या या महत्वपूर्ण  लढ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मजबुतीने अन्य विरोधी पक्षांसोबत उभा आहे अशी ग्वाही तपासे यांनी दिली. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत धर्मनिरपेक्षता, संवैधानिक मूल्ये बळकट करण्यासाठी आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेची अंमलबजावणी हे मुद्दे जनतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणार असेही महेश तपासे म्हणाले.