बॉक्स ऑफिसचा ‘बादशाह’ बनला शाहरुख! ‘पठाण’ने जमवला १०० कोटींचा गल्ला; मोडले सर्व रेकॉर्ड

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा ‘पठाण’ (Pathaan) हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादात अडकला होता. मात्र विवादानंतरही पठाण सिनेमाने पहिल्याच दिवशी विक्रमतोड कमाई केली आहे. ‘किंग खान’ शाहरुखने पठाण सिनेमातून जवळपास ४ वर्षांनंतर सिनेसृष्टीत पदार्पण केले असून त्याने पदार्पणातच धुराळा उडवला आहे. अ‍ॅक्शन एंटरटेनर पठाणसोबत पुनरागमन करत शाहरुखने बॉक्स ऑफिस कलेक्शनवर इतिहास रचला. यासोबतच त्याला ‘बॉलीवूडचा बादशाह’ का म्हणतात हेही सिद्ध केले आहे. पठाणच्या पहिल्या दिवसाच्या कमाईने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. (Pathaan Box Office Collection)

जगभरात बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई 
पठाणने पहिल्या दिवशी भारतात ५४ कोटींची शानदार सलामी दिली. आता पठाण हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील बॉक्स ऑफिसवरही पठाणचा डंका वाजत आहे. सुपरस्टार शाहरुखच्या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई केली आहे.

ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी ट्विट करून पठाणच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, पठाणने जगभरातील बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. शाहरुखने या चित्रपटाद्वारे युएई आणि सिंगापूरमध्ये पहिल्या क्रमांकावर पदार्पण केले आहे. पठाणने बुधवारी (२५ जानेवारी) दुपारपर्यंत न्यूझीलंडमध्ये $110,000, ऑस्ट्रेलियामध्ये $600K आणि युएसएमध्ये $1 दशलक्ष कमावले होते.

दरम्यान ‘पठाण’ने पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ आणि कन्नड सुपरहिट चित्रपट ‘केजीएफ 2’लाही मागे टाकलं आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत ‘पठाण’ने 25.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. ही कमाई हृतिक रोशनच्या ‘वॉर’पेक्षाही अधिक आहे. प्रदर्शनापूर्वीही ‘पठाण’नेही ॲडव्हान्स बुकिंगचा विक्रम मोडला होता. पठाण सिनेमाला प्रजासत्ताक दिनाचा खूप फायदा होणार आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडाही दुप्पट होण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे नॉनस्टॉप शो सुरू आहेत.