जिथं कोयता घेऊन राडा केला तिथं नेऊनचं धिंड काढली; पुणे पोलिसांचा नवा पॅटर्न

धायरी –  पुण्यात कोयता गँगची (Koyata Gang) दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील धायरी परिसरात असणाऱ्या भैरवनाथ मंदिराजवळ काही गुंडांनी धुडगूस घातला होता. यामध्ये भाजी मंडई येथे कोयते हातात घेऊन दहशत निर्माण केली होती. त्यांनी एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वारही केले होते. त्याच सराईत गुंडांना पुणे पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

आता याच सराईत तीन गुंडांना सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर धायरी फाटा ते धायरी गाव दरम्यान कोयता गँगची धिंड काढण्यात आली आहे. कोयता हातात घेऊन दहशत माजविणारे गुंड मनोज कटीमनी, रोहित राठोड आणि रोशन आढाव (Manoj Katimani, Rohit Rathod and Roshan Adhaav) यांच्यावर पुणे पोलीसांनी कारवाई केली आहे.

या गुंडांवर गुन्हा दाखल केला असून कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या गुंडाना पोलिसी खाक्या दाखविला आहे, त्यामध्ये गुंडांची धिंड काढण्यात आली आहे. ज्या ज्या परिसरात या गुंडांनी धुडगूस घातला, त्याच परिसरात धिंड काढणे आणि चोप देण्याची मोहीमच पुणे पोलीसांनी हाती घेतली आहे.tv9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.