आपले राजकीय दुकान बंद होईल या भीतीने पवार-केजरीवाल एकत्र आले – फडणवीस 

सोलापूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान (Bhagwant Maan Singh) यांनी आधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि नुकतीच  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे.  यावेळी अरविंद केजरीवाल यांनी संसदेत दिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला विरोध करण्यासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली. मात्र  या भेटीमुळे अरविंद केजरीवाल हे टीकेचे धनी बनले आहेत. कारण एकेकाळी शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे केजरीवाल आज त्यांच्याच दारात पाठींबा मागण्यासाठी गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी आप आणि राष्ट्रवादीवर टीका केली. ते म्हणाले, अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वी शरद पवार यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केले होते मात्र आज ते केवळ आपले राजकीय दुकान बंद होईल या भीतीने एकत्र येत आहेत. केवळ नरेंद्र मोदी यांना विरोध म्हणून ही मंडळी आता एकत्र येत आहे. मात्र नरेंद्र मोदी यांच्यावर लोकांचा विश्वास असून, ते आता वैश्विक नेते झाले आहेत असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.