पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी – चिंचवड विधानसभा पोट-निवडणुकीसाठी आज मतदान 

 Pune – कसबा पेठ आणि पिंपरी–चिंचवड विधानसभा जागांच्या पोट-निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.या पार्श्वभूमीवर स्वारगेट परिसरात काल आणि आज वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. स्वारगेट इथल्या जेधे चौक भुयारी मार्गातून सारसबागेकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली असून,नटराज हॉटेल इथून सारसबागेकडे जाणाऱ्या भुयारी मार्गालगतच्या उजवीकडील सेवा रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.त्याऐवजी या रस्त्यावरील वाहनं जेधे चौकातील भुयारी मार्गालगतच्या डाव्या बाजूच्या सेवा रस्त्यानं वळविण्यात आली आहे.आज सायंकाळी सात ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.

मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी दीड हजार कर्मचारी तैनातीबरोबरच 10 शीघ्र कृती दलं, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 5 तुकड्या, 300 होमगार्ड, 1 राज्य राखीव दलाची तुकडी,700 पोलीस कर्मचारी, 20 निरीक्षक,आणि 90 उपनिरीक्षक तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

कसबा मतदार संघात आत्तापर्यंत 28 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक विभागामार्फत सुमारे 3000 प्रशिक्षणार्थींना तिसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण काल देण्यात आलं. या मतदार संघात 51 राखीव पथकं ठेवण्यात आली आहेत.या निवडणुकीची मतमोजणी 2 मार्चला होणार आहे.