आता शिवसैनिकांनी ठरवायचे आहे खरी शिवसेना कोणाची उद्धवजींची की एकनाथ शिंदे यांची?

पुणे – एकीकडे आमदार-खासदारांच्या बंडामुळे डॅमेज कंट्रोल भूमिकेत गेलेल्या शिवसेनेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पुण्यात एका महिला नेत्याचं शिवसेनेत इनकमिंग झाल्याची माहिती समोर येत आहे. सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) असं या महिला नेत्याचं नाव असून त्यांनी आता शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. सुषमा अंधारे या भीमा कोरेगाव प्रकरणातील तक्रारदारही आहेत, हे विशेष.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत अंधारे या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती मिळाली आहे. अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा अंदाज व्यक्त केला जात होता. अखेर आज यावर शिक्कामोर्तब झालं.

याच मुद्द्यावरून आता भाजयुमोचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांनी एक व्हिडीओ शेअर करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, हिंदू देवी-देवतांवर गरळ ओकणारी, हिंदू धर्माचा व प्रथा-परंपरांचा सतत अपमान करणारी सुषमा अंधारे आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश करत आहे, हिचे विचार ऐकून आता शिवसैनिकांनी ठरवायचे आहे खरी शिवसेना कोणाची उद्धवजींची की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची?