भाई-बाबुशच्या आठवणीत पंतप्रधान मोदी झाले भावुक…

म्हापसा : गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहचला असून आता प्रचार रंगात आला आहे. भाजप , काँग्रेस , आणि नव्याने गोव्यात दाखल झालेल्या आप आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांत खरी लढत पाहायला मिळत आहे.

विधानसभेच्या अवघ्या चाळीस जागा असणाऱ्या गोव्यातील राजकारणाची विविध कारणांमुळे देशभर चर्चा होताना दिसून येत आहे. निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपल्याने आता सर्वच पक्षांनी जोर लावला असून आज भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हापश्यात जाहीर सभा घेतली.

या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ‘भाई-बाबुश’च्या जोडीची अर्थात मनोहर पर्रीकर आणि फ्रँसिस डिसोझा यांनाच आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, ‘ मी जेव्हा गोव्यात येतो तेव्हा माझे मित्र मनोहर पर्रीकर यांची आठवण येते  याशिवाय मी गोव्यात आल्यावर मला फ्रान्सिस डिसुझा यांची सुद्धा आठवण येते कारण मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली , फ्रान्सिस डिसोझा हे गोव्याच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे प्रतीक होते. ते भाजपच्या विचारधारेचे खऱ्या अर्थाने वाहक होते.’

या सभेला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रभारी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रभारी सी.टी.रवी, खासदार विजय तेंडुलकर, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्यासह बार्देश मधील सर्व उमेदवारांनी हजेरी लावली.