‘जयकुमार जेव्हा तुमची चौकशी लावेल तेव्हा दोन वर्षे जामीन मिळायचा नाही’

धामणी – भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे. पवारांनी मुख्यमंत्री असताना त्यांना ‘पीए’ म्हणून ठेवले. जिल्हाधिकारी, सीइओ, आयुक्त, सचिव केले. एमआयडीसीचे सीओ असताना आपल्या भागात यांनी किती वसाहती आणल्या ते जनतेला एकदा सांगावे. त्यामुळे अशा भ्रष्टाचारी माजी अधिकाऱ्याने माझ्या नादाला लागू नये. अन्यथा, या वयात पळता भुई थोडी होईल, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी दिला आहे.

धामणी येथे विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भाजप जिल्हाध्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार कार्यक्रमात आमदार गोरे बोलत होते. ‘नंगे को खुदा भी डरता है…’ हे लक्षात ठेवा. तुमची चौकशी लागली तर काय होईल ते बघा. तीनशे एकर जमीन, कोट्यवधींची प्रॉपर्टी, मॉल, मगरपट्टा, साताऱ्यातील आणि इतर ठिकाणी असणारे भूखंड रडावर आहेत. जयकुमार जेव्हा तुमची चौकशी लावेल तेव्हा दोन वर्षे जामीन मिळायचा नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही अधिवेशनात संघर्ष करुन शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवायला आणि शेतकऱ्यांना ५० हजारांचे सानुग्रह अनुदान देण्यास सरकारला भाग पाडले आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून समाजातील प्रत्येक घटकाला मदत केली जात आहे. गेल्या १२ वर्षात माण-खटाव मतदारसंघातील प्रत्येक गावाला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी आणि इथल्या मातीचा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी अहोरात्र झटलो आहे. सरकारनामाने याबाबत वृत्त दिले आहे.