भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन याठिकाणी सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करा – भुजबळ  

नागपूर – भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक करून याठिकाणी सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करण्यात यावी यासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्यासह लोक आंदोलनास बसले आहे. शासनाने ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या वयाचा विचार करता ताबडतोब भिडे वाड्याच्या स्मारकाचा निर्णय घ्या अशी मागणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नियम ९७ अन्वये सूचना मांडली.

यावेळी भिडे वाड्याच्या प्रश्नावर सरकार गंभीर असून तात्काळ बैठक घेऊन निर्णय घेत आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दिले आहे.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम ९७ अन्वये स्थगन प्रस्तावाची सूचना मांडत सभागृहाचे लक्ष वेधले.

पुणे येथील भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी आज दिवसभर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्यासह अनेक नागरिक भिडेवाड्याच्या समोर उपोषणाला बसलेले आहे. बाबा आढाव यांच्या वयाचा विचार करता शासनाने याबाबत तातडीने निर्णय घेण्यात  यावा अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

भिडेवाडा येथे “सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा” सुरु करण्याचा शासनाने दि. २७ नोव्हेंबर २०२१ रोजी निर्णय घेतलेला आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दांपत्याने मुलींची पहिली शाळा दि. १ जाने १८४८ रोजी पुण्यात बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात सुरु केली आणि स्त्री शिक्षणाचे बीज हिंदुस्थानात रोवले आहे. शुद्रातिशूद्र समाजासाठी ज्ञानाची कवाडे खुली करून शिक्षण क्षेत्रात त्यांनी क्रांती घडवून आणली आहे. ही ऐतिहासिक वास्तू पुणे महानगरपालिकेने विहित पद्धतीने ताब्यात घेवून त्याठिकाणी राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी मनपाने दि. २१ फेब्रुवारी २००६ रोजी ठराव क्र. ५५७ अन्वये ठराव मंजूर केलेला आहे आणि भिडेवाडयात पुणे महानगरपालिकेच्यावतीने मुलींची शाळा सुरु करण्याचा दि.२७ नोव्हेंबर २०२१ रोजी उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे. महानगरपालिकेने ही ऐतिहासिक वास्तू ताब्यात घेऊन या ठिकाणी “सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा” सुरु करून राष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्याची आवश्यकता आहे.

यावरील उत्तरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्यासह काही लोक भिडे वाड्याच्या प्रश्नांवर आंदोलनास बसले आहे. सरकार या प्रश्नावर गंभीर असून छगन भुजबळ यांनी या अगोदर देखील या प्रश्नाबाबत चर्चा केली आहे. याबाबत आपण आता तात्काळ बैठक घेऊन याबाबतचा निर्णय घेतला जाईल. तसेच त्यासाठी आवश्यक तेवढा निधी राज्यशासन उपलब्ध करून देईल असे आश्वासन छगन भुजबळ यांना दिले.