Ajit Pawar | ‘आयत्या बिळावर नागोबा’ असणारे हे लोक दुसऱ्याचा पक्ष फोडणारे ‘गद्दार’ आहेत

NCP Name & Symbol : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP Party) हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतला आहे. विधिमंडळातील बहुमत चाचणीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. याचिकाकर्ते अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (NCP Party) असून त्यांना पक्षाचे हे नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार आहे, असं आयोगानं आपल्या निर्णयात स्पष्टपणे नमूद केलं आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केलं आहे. तर शरद पवार गटांनं या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचं ठरवलं असल्याचं शरद पवार यांच्या कन्या आणि राज्यसभेच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाच्या या निकालावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, आज राज्य निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे तो अपेक्षितच होता. कारण राज्य निवडणूक आयोग भाजपच्या दावणीला बांधला गेला आहे हे सर्वसामान्य जनतेला ठाऊकच आहे. सत्तेसाठी सदैव अधीन असणाऱ्या भाजपने अखेर आपल्या दोन्हीही बाहुल्यांचे चोचले पूर्ण करुन दाखवले. केंद्रीय यंत्रणांना सदैव आपल्या स्वार्थासाठी वापरणाऱ्या भाजपने शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचे देखील चिन्ह आणि नाव चोरून अजित पवार गटाला भीक घातली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला आहे? हे अवघ्या देशाला माहित आहे. आज ज्यांनी हा पक्ष फोडला त्यांनी आदरणीय शरद पवार साहेबांच्या नावावर अनेक राजकीय पदे व मंत्रीपदे उपभोगली. त्यांच्यात एवढीच धमक होती तर त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला असता. परंतु ‘आयत्या बिळावर नागोबा’ असणारे हे लोक दुसऱ्याचा पक्ष फोडणारे ‘गद्दार’ आहेत.

देशातील आणि राज्यातील सामान्य जनता मात्र सदैव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीशी होती, आहे व यापुढेही सदैव राहील. ‘घड्याळ’ गेले असले तरी ‘वेळ’ मात्र आमचीच राहणार. यापुढे आमचा पक्ष, आमचं चिन्ह फक्त आणि फक्त शरदचंद्रजी गोविंदराव पवार, असे रोखठोक प्रतिपादन जाधव यांनी केले.

महत्वाच्या बातम्या –

Breaking! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचंच; निवडणूक आयोगाचा निर्णय

निखिल वागळेंच्या अडचणी वाढणार? पत्रकाराविरोधात सुनील देवधर यांच्याकडून पुणे पोलिसांत तक्रार

Jitendra Awhad | ज्या माऊलीने तुम्हाला सगळं दिलं, तिचं कुंकू कधी पुसलं जाईल याची वाट बघताय?