WPL Auction Live: दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात आणखी एक हिरा! ‘लेडी सेहवाग’ शेफालीला ‘इतके’ कोटी मोजत घेतले विकत

WPL Auction 2023 Live Update: मुंबईत सुरू असलेल्या महिला आयपीएल २०२३च्या लिलावात मातब्बर खेळाडूंना विकत घेण्यासाठी ५ फ्रँचायझींमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. भारताची धडाकेबाज सलामीवीर स्म्रीती मंधाना आतापर्यंतची लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरली. तिला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ३.४ कोटींना विकत घेतले. स्म्रीतीबरोबरच भारताची प्रतिभाशाली क्रिकेटपटू शेफाली वर्मा हिच्यावरही सर्वांची नजर होती.

काही दिवसांपूर्वी झालेल्या १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाची कर्णधार शेफाली वर्मा (Shafali Verma) हिची टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी प्रशंसनीय राहिली आहे. तिच्या फटकेबाजीच्या कौशल्यामुळे तिला लेडी सेहवाग म्हणूनही ओळखले जाते. याच शेफालीला आयपीएल लिलावात २ कोटींची किंमत मिळाली आहे. दिल्ली कॅपिटल्सने तिला विकत घेतले आहे. तिची मूळ किंमत ५० लाख रुपये होती.

शेफालीबरोबरच आणखी एका मोठ्या खेळाडूला विकत घेण्यात दिल्ली कॅपिटल्सला यश आले. दिल्ली कॅपिटल्स संघाने जेमिमाह रोड्रिगेजला (Jemmimah Rodrigues) २.२ कोटी रुपयांना विकत घेतले. ती ५० लाखांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरली होती.