भारतात भाजप रॉकेल ओतून आग लावतो आहे – राहुल गांधी 

लंडन – देशात सध्या रॉकेल शिंपडण्याचे काम भाजप (BJP) करत आहे. त्याची एक ठिणगी मोठी आग लावू शकते. ही आग विझविण्याची जबाबदारी काँग्रेसची (Congress) आहे. असं काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) ब्रिटनमध्ये बोलताना म्हणाले. शुक्रवारी 20 मे रोजी, त्यांनी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात आयडियाज फॉर इंडिया (Ideas for India at Cambridge University, London) परिषदेत भाग घेतला. त्यावेळी त्यांनी विविध आरोप करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

काँग्रेस पक्षाला हे वाटतं आहे की भारत जसा आधी होता तसा तो व्हावा. भारताला ते स्थान पुन्हा मिळावं म्हणून आम्ही लढतो आहोत. मात्र भाजपकडून लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे, आम्ही लोकांचा आवाज ऐकतो आहोत. भारतात सध्या अशा संस्थांवर हल्ला केला जातो आहे ज्या संस्थांचा या देशाच्या निर्मितीत मोठा सहभाग होता.

राहुल गांधी म्हणाले की भाजप सरकार आल्यापासून बेरोजगारी (Unemployment) वाढली आहे. एवढंच नाही तर ध्रुवीकरणही वाढलं आहे. भारतात चांगलं वातावरण सध्या नाही. भाजप चारही बाजूंनी रॉकेल ओतण्याचं काम करतं आहे. आम्हाला भारताची ही प्रतिमा पुन्हा एकदा बनवायची आहे जिथे वेगवेगळे विचार मांडले जाऊ शकतात. तसंच चर्चाही घडू शकतात.