महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचावे यासाठी जलसंपदा विभाग काम करतेय – पाटील

मुंबई – महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचावे यासाठी शासनाचा जलसंपदा विभाग काम करत आहे. या उद्देशाने शासनाने अनेक कामे पूर्ण केली असून अनेक कामे सुरू असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सभागृहात दिली.

मंगळवारी विधानसभेत २६३ अन्वये अनुदान मागणीवर चर्चा करण्यात आली. यावेळी विधानसभेतील सर्व सदस्यांनी या चर्चेत भाग घेत अनेक चांगल्या सुचना केल्या.

गोदावरी थट कालवा दुरुस्तीच्या कामाला महाविकास सरकारमध्ये गती मिळाली असून पुढील दोन वर्षात मोठे काम होईल. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून निळवंडे धरणाच्या कामाला मोठी गती मिळाली आहे. कोविडच्या काळात आर्थिक चणचण असताना या प्रकल्पासाठी ८२३ कोटी ७२ लाख रुपये दिले गेले तर यंदाही २२-२३ यावर्षी ३६५ कोटीची तरतूद आहे. निळवंडेच्या डाव्या कालव्याचे व उजव्या कालव्याचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे निळवंडे काम पूर्ण झाले पाहिजे यासाठी सरकारने विशेष प्राधान्य दिले आहे.

३० प्रवाही वळण योजना करून मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न असल्याचेही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

नदीजोड योजना प्रस्तावित आहेत त्यासाठी अहवाल तयार केला जात आहे. या दोन्ही नदी जोड योजनांची कामे आम्ही तात्काळ सुरू करू. गोदावरी खोऱ्यात जसं शक्य होईल तसं पाणी आणू असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.

जायकवाडी धरणाचे दोन्ही कालवे अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न असून हे काम पूर्ण झाले तर मराठवाड्यातील पाणी टंचाई असलेल्या भागांना पाणी मिळेल. मराठवाड्याकडे संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे.मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष कमी करायचे असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.

कोरोनाच्या काळात पहिल्या वर्षी निधीची कमतरता आली मात्र आम्ही मागे हटलो नाही. प्रकल्प पूर्ण करण्याचे कालबद्ध कार्यक्रम आम्ही आखले आहेत ज्यामुळे येत्या काळात १०४ प्रकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली.

इतर सदस्यांनी महत्त्वाच्या बाबी सभागृहात मांडल्या. त्यांचाही विचार करून योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासनही जयंत पाटील यांनी दिले.