राहुल गांधी यांची आई इटालियन आणि वडील भारतीय त्यामुळे…; भाजप नेत्याची मार्मिक टीका

नवी दिल्ली – देशाचा अर्थसंकल्प मंगळवारी संसदेत मांडला गेला. दुसऱ्या दिवशी (2 फेब्रुवारी 2022) बुधवारी लोकसभेत (Lok Sabha) यावर चर्चा झाली. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील (Presidential Address) आभार प्रस्तावावर बोलताना काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजप सरकारच्या (BJP Government) धोरणांवर जोरदार हल्ला चढवला.

यावेळी गांधी म्हणाले, देशात दोन भारत तयार करण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे. एक भारत असा आहे जो खूप श्रीमंत आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांना पाणी, वीज यासारख्या समस्या भेडसावत नाहीत. दुसरा भारत असा आहे की गरीब पिचलेल्या लोकांचा भारत आहे. या दोन भारतामधील दरी वाढत असल्याचं गांधी म्हणाले. या दोन्ही भारतांच्या दरम्यानची दरी दिवसेंदिवस वाढत आहे, असं वक्तव्यराहुल गांधी यांनी केलं होतं.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या या दोन भारताबद्दलच्या वक्तव्यावरून भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला असून त्यांना प्रत्युत्तर दिलंय. हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे. “राहुल गांधींना एका भारतात दोन भारत दिसणे स्वाभाविक आहे. कारण ते दोन संस्कृतींमध्ये वाढलेले आहेत; त्यांच्या आई सोनिया गांधी इटालियन असून वडील राजीव गांधी हे भारताचे होते. त्यामुळे ते इटली आणि भारताच्या संस्कृतीत वाढले. परिणामी त्यांच्या विचारांमध्ये नेहमीच संघर्ष होत असतो,” असं विज यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.