राज्यसभेच्या निवडणुकीत येणार रंगत; भाजपने घोषित केला तिसरा उमेदवार

मुंबई – राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपने (Bjp) वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेसाठी (Rajya Sabha) उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. भाजपने माजी मंत्री कृषी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) आणि मोदी सरकारमध्ये विद्यमान मंत्री असलेल्या पियूष गोयल (Piyush Goyal) यांच्यासह आता धनंजय महाडिक (dhananjay mahadik)यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे.

भाजपकडे तिसऱ्या जागेसाठी उमेदवार देणार अशी चर्चा होती, मात्र, तिसऱ्या जागेसाठी सस्पेन्स होता. अखेर उमेदवारीची माळ महाडिक यांच्या गळ्यात पडली. दरम्यान, तिसऱ्या जागेसाठी विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची चर्चा रंगली होती. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी राज्यसभेची निवडणूक आता रंगतदार होण्याची शक्यता आहे.

देशातल्या 15 राज्यातील 57 जागांवर राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सर्व 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होत आहे. 57 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 21 जून ते 1 ऑगस्ट यादरम्यान संपत आहे. राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तयारी सुरु केली आहे. ज्या महत्त्वाच्या नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यामध्ये काही दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे.