“रामायण हे मनोरंजनासाठी नाही”, सीता मातेची भूमिका साकारलेल्या दीपिका चिखलीया यांचं वक्तव्य

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष (Adipurush) हा सिनेमा रिलीज झाल्यापासून वादात सापडला आहे. सिनेमातील दृश्ये, पात्रांचे डायलॉग्ज अशा बऱ्याच कारणांवरुन आदिपुरुषवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. आदिपुरुषची रामायणासोबत (Ramayan) तुलना केली जात आहे. रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील पात्रांनीही आदिपुरुषवर नाराजी व्यक्त केली आहे. रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल, लक्ष्मण साकारणारे सुनील लहरी यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता सीता मातेची भूमिका करणाऱ्या दीपिका चिखलिया (Dipika Chikhaliya) यांनीही आदिपुरुषवर टीकास्त्र सोडले आहे.

दीपिका चिखलिया यांनी ‘पीटीआय’ला मुलाखत दिली. त्या म्हणाल्या, “हिंदू महाकाव्य ही मनोरंजनासाठी नाहीत. दिग्दर्शकांनी दर काही वर्षांनी यात बदल करताना विचार केला पाहिजे. संवाद, चित्रपटात वापरण्यात आलेली भाषा आणि त्यातील काही पात्रांच्या चुकीच्या प्रदर्शनामुळे ‘आदिपुरुषवर’ टीका होत आहे.”

“मालिका किंवा चित्रपटाच्या माध्यमातून दर काही वर्षांनी ‘रामायण’ पडद्यावर येईल. यातील काही गोष्टी लोकांना खटकतील. कारण आमच्यासारखी रामायणाची ही प्रतिकृती नसेल. आपण प्रत्येक दोन वर्षांनी ‘रामायण’ बनवण्याचा प्रयत्न का करत आहोत? मला सगळ्यात या गोष्टीचं वाईट वाटतं. ‘रामायण’ हे मनोरंजनासाठी नाही. ते एक पुस्तक आहे. ज्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. आपल्या संस्काराची मुल्ये आहेत,” असंही दीपिका पुढे म्हणाल्या.