शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीत पोहोचवण्यासाठी आक्रोश मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार

NCP Chairman Sharad Pawar: देशातील शेतकरी संकटात असतानाही त्यांच्याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही, अशाने देश कसा चालणार असा हल्लाबोल केंद्र सरकारसह राज्य सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या समारोप प्रसंगी बोलताना केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी-जुन्नर येथून किल्ल्याच्या पायथ्यापासून २७ डिसेंबर रोजी शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात केली होती. या शेतकरी आक्रोश मोर्चाचा आज शनिवारी ३० डिसेंबर रोजी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समारोप झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब होते. तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी आणि सामान्य जनता या मोर्चात सहभागी झाली होती.

शरद पवार बोलताना म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांच्या सुख दुःखाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचावा या हेतून आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. आज देशातील शेतकरी अस्वस्थ आहे. काल मी अमरावतीमध्ये गेल्यानंतर बातमी वाचायला मिळाली की, १० दिवसांमध्ये, अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्याकील २५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. देशाची भूक भागविणारा शेतकरी आज आत्महत्या करतोय ही अस्वस्थ करणारी परिस्थिती तयार झाली असल्याचे शरद पवार म्हणाले.

पुढे शरद पवार म्हणाले की, मी कृषीमंत्री झालो तेव्हा यवतमाळमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी समजली. मी तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंहांना भेटलो. त्यांना म्हंटले आपण या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटावे. दुसऱ्या दिवशी दिल्लीवरुन नागपूरला आलो, तिथून त्या शेतकऱ्याच्या घरी पोहचलो. त्यांच्याशी संवाद साधला. आम्ही तेथे विचारलं तर कळालं की, आधीच डोक्यावर कर्ज, त्यात दुष्काळी परिस्थिती आली. अशातच शेतकऱ्यांवर सावकाराने कारवाई करत त्याच्या घराचा लिलाव काढला. या चौहुबाजुने आलेल्या संकटामुळे त्या शेतकऱ्यांनी वीष प्राशन करून आत्महत्या केली. शेतकऱ्यांचा सन्मान राहला नाही की ते जीव देतात, तीच परिस्थिती आजसुद्धा आली आहे.असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, त्या शेतकरी आत्महत्येनंतर रिझर्व्ह बॅंकेकूडन माहिती घेतली की, देशातील किती शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. तर माहिती आली की, ७२ कोटी. त्यावेळी एका क्षणाचाही विचार न करता ७२ कोटींचं कर्ज माफ करून टाकलं. परंतु आज त्या शेतकऱ्याकडे कुणी ढुंकून पाहत नाही, कंदा उत्पादक, हरभरा उत्पादक शेतकरी संकटात असतानाही त्यांच्याकडे कुणी बघत नाही. मी कृषीमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अमेरिकेतून धान्य मागविण्यासाठीच्या परवानगीची पहिली फाईल आली. मला ही गोष्ट खटकली. तिथून तीन वर्षात शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली. मागेल तेवढे धान्य शेतकऱ्यांना मिळू लागले. जगातील १८ देशांना भारत धान्य निर्यात करु लागला. पण आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघितले जात नाही. आपला कृषी प्रधान देश म्हणुन ओळखल्या जातो. पण आम्हाला कृषी मंत्री नाही, अशीही खंत शरद पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

शरद पवार म्हणाले की, आज अमोल कोल्हे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्रश्न मांडला त्यासाठी मी धन्यवाद देतो. पण हेही सांगतो की, त्यांचा हा आक्रोश मोर्चा पुण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. दिल्लीतही या मोर्चाची दखल घेतली गेली आहे. शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये बदल करण्याच्या तुमच्या प्रयत्नांना १०० टक्के यश येईल, असाही आशावाद व्यक्त करत शरद पवार यांनी यांनी यावेळी कोल्हे यांचे कौतुक केले.

महत्वाच्या बातम्या-

‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’

आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’