रिपब्लिकन पक्षाचा झोपडपट्टी वासीयांच्या प्रश्नांवर उद्या आझाद मैदानात घर हक्क मोर्चा

मुंबई – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) प्रणित झोपडपट्टी महासंघाच्या वतीने उद्या दि.15 मार्च रोजी दुपारी 12 वाजता आझाद मैदानात झोपडपट्टीवासीयांच्या, आदिवासी,कोळी यांच्या प्रश्नांवर घर हक्क धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुंबईतील वन जमीनीवरील,रेल्वेच्या जमीनीवरील, बीपीटीच्या जमिनीवरील, विमानतळ परिसरातील विविध झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नांवर तसेच आदिवासी-कोळी यांच्या जमिनीचे त्यांच्या स्व इच्छेने मालकीहक्कांचे पुनर्वसन व्हावे(झोपडपट्टी योजनेत न करता)मुंबई महानगर पालिकेतील सफाई कामगारांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत मालकी हक्काचे घर मिळावे या मागण्या घेऊन घर हक्क धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या घर हक्क धडक मोर्चाचे नेतृत्व रिपाइं महिला आघाडी च्या राष्ट्रीय मार्गदर्शक सौ सीमाताई आठवले, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर,राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे करणार असल्याची माहिती या मोर्चाचे संयोजक रिपाइं झोपडपट्टी महासंघाचे मुंबई अध्यक्ष सुमित वजाळे यांनी दिली आहे.

मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना कोणतीही अट न ठेवता पाणी वीज आदी प्राथमिक सुविधा द्याव्यात. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 500 फुटांचे घर द्यावेत.तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला काल मर्यादा पाळण्यासाठी रेरा कायद्याच्या कक्षेत एस आर ए इमारती आणाव्यात अशी महत्वाची मागणी या मोर्चात करण्यात येणार आहे अशी माहिती रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी दिली आहे.