पुणे जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार : जयंत पाटील

मुंबई : पुणे जिल्ह्यातील पाण्याच्या प्रश्नाबाबत शासन संवेदनशील आहे. पाण्याच्या प्रश्नाबाबत प्राप्त निवेदनांवर कार्यवाही सुरू असल्याची माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली.

पुणे जिल्ह्यातील मावळ व मुळशी तालुक्यात सहा धरणे आहेत या धरणातील पाणी दौंड, पुरंदर आणि बारामती तालुक्यास मिळाल्यास दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवाणे तसेच तलावांचे फेर सर्वेक्षण करावे अशी लक्षवेधी सूचना सभागृहात मांडण्यात आली. लक्षवेधीत विधानसभा सदस्य जयकुमार गोरे, धीरज देशमुख, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाग घेतला.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, कृष्णा पाणी तंटा लवादाने प्रती जलवर्षासाठी कृष्णा खोऱ्याबाहेर पाणी वळवण्यासाठी सरासरी व महत्तम मर्यादा ठरवून दिली आहे. कृष्णा खोऱ्यातील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता २ ऑगस्ट २०२८ अन्वये भावे समिती गठित करण्यात आली आहे. तसेच समितीच्या अहवालावर अभ्यास करून पुढील धोरण ठरविण्यासाठी तज्ज्ञ समिती गठित केली आहे. तज्ज्ञ समितीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यावर कार्यवाही होईल. तसेच खडकवासला प्रकल्पांतर्गत जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या मूळ मंजूर प्रकल्पीय अहवालामध्ये एकूण ६५ तलावांचा समावेश असून त्यापैकी ४५ तलावांना सध्या पाणी सोडण्यात येते. मंजूर प्रकल्प अहवालामध्ये समावेश नाही अशा तलावांबाबत उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी क्षेत्रीय व महामंडळ स्तरावर सर्वेक्षण सुरू आहे, हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर प्राप्त निकषानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.