‘याच’ कार्यपद्धतीमुळे राज्यातून प्रकल्प चालले; म्हाडा भरती प्रक्रियेवरून सचिन सावंत यांची टीका

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सरळ सेवा भरती २०२१ मधील पात्र, नियुक्त उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील ४२१ जणांना सेवेत रुजू करण्यात येणार आहे. यासाठीच्या नियुक्ती पत्राचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ही पत्रे वितरित करण्यात येणार आहेत.

दरम्यान, एका बाजूला हा इव्हेंट करून सरकार आपली पाठ थोपटून घेत असताना आता हा इव्हेंट वादात सापडला आहे. म्हाडाने अंतिम निवड यादीत नाव असणाऱ्या सर्वाना अधिकृतपणे ३ तारखेच्या या कार्यक्रमाला हजर राहण्याबाबत कळवले होते मात्र ऐनवेळी आता काही ठराविकच उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याचा घाट म्हाडाने घातला आहे. या सर्व घडामोडी पाहून आता परीक्षार्थी देखील चांगलेच नाराज झाले असून म्हाडाच्या या हास्यास्पद आणि नियोजनशून्य कारभारापुढे हतबल झाले आहेत. विशेष म्हणजे या परीक्षार्थींनी का येवू नये आणि त्यांना नियुक्तीपत्रे का त्या दिवशी मिळणार नाहीत याबाबत कोणतेही ठोस कारण म्हाडाने दिलेले नाही.

याच मुद्द्यावरून आता कॉंग्रेसनेते सचिन सावंत यांनी सरकारला आणि म्हाडाला चांगलंच झापलं आहे. म्हाडाच्या गलथान कारभारावर प्रहार करताना सावंत म्हणाले, उत्सव व विरोध संपवणे प्राधान्य असणाऱ्या राज्य सरकारचे प्रशासनाकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. म्हाडाचे सेवाभरती नियुक्तीपत्र वितरण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ३ नोव्हेंबरला आहे. २७ ऑक्टो ला १४ संवर्गातील ४२१ पदांना पात्र लोकांना निमंत्रण गेले तर २८ ऑक्टोबर ला त्यातील ४ संवर्गातील लोकांना येऊ नका सांगितले गेले. त्यांचा कार्यक्रम पुढे आयोजित केला जाईल असे सांगितले गेले आहे. प्रशासनाकडून असे संभ्रमाचे वातावरण तयार करणे कितपत योग्य? याच कार्यपद्धतीमुळे राज्यातून प्रकल्प चालले. अतीवृष्टी बाधित शेतकरी वाऱ्यावर सोडले गेले. असं म्हणत सरकारवर तोफ डागली आहे.