जाणीवपुर्वक आदिनाथ अडचणीत आणण्यासाठी निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत ?

करमाळा (प्रतिनिधी) –  आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपला असून जाणीवपूर्वक आदिनाथ कारखाना अडचणीत आणून त्याचे खासगीकरण करायची ही भूमिका घेतलेल्या काही विघ्नसंतोषी लोकांनी आदिनाथ ची निवडणूक पुढे लढविण्याचा प्रयत्न राजसत्तेचा वापर करून सुरू केला आहे. यात आदिनाथ  व पर्यायाने पर्यायाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार असून तात्काळ आदिनाथ च्या निवडणुका घ्याव्यात अशी मागणी तीस हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे.

करमाळा तालुक्याची विकासाची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिनाथ सहकारी साखर कारखाना केवळ 80 कोटी रुपयांच्या कर्जासाठी भाडेकराराने देण्याचा घाट घातला आहे. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील इतर कारखान्यावर  300 ते साडेतीनशे कोटी रुपयांची कर्जे असताना अशा कारखान्यांना कर्जाचे पुनर्गठन करून राज्य शिखर बँकेने दिले आहे. राज्य शिखर बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजेच शरद पवारांचे वर्चस्व असून हा कारखाना भाडेकराराने मिळवण्यासाठी आमदार रोहित पवार जिवाचे रान करत आहेत  काही जणांच्या राजकीय महत्वकांक्षा व वैयक्तिक स्वार्थ यामुळे आदिनाथ कारखाना गेली दोन वर्षांपासून बंद आहे. अडीचशे कोटी रुपयांची मालमत्ता असलेला कारखाना केवळ दोन कोटी रुपयाची ठेव ठेवून खाजगी व्यक्तीला वार्षिक पाच कोटी रुपये भाड्याने देण्याचा प्रस्ताव शिखर बँकेने पुढे आणला आहे.शिवाय सध्या कारखान्यांमध्ये 80 कोटी रुपयांची साखर शिल्लक आहे.

तीन हजार मेट्रिक टन गाळप क्षमता असलेला आदिनाथ कारखाना दरवर्षी आठ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करू शकतो मात्र हा कारखाना गेली दोन वर्षांपासून बंद असल्यामुळे ऊस उत्पादकांना आपला ऊस कवडीमोल भावाने खासगी कारखान्यांना द्यावा लागत आहे.आदिनाथ च्या आजूबाजूला असलेल्या सर्व खाजगी कारखान्याच्या मालकांना आदिनाथ बंद पडावा असे वाटत असून त्यादृष्टीने अशी मंडळी पडद्यामागून राजकीय डावपेच करत आहेत.बागल गटाची सध्या आदिनाथ कारखाना व सत्ता असून त्यांनीच पुढाकार घेऊन आदिनाथ कारखाना रोहित दादांना देण्याचा प्रयत्न केला होता मात्र नंतरच्या काळात आमदार रोहित पवार व बागल परिवारामध्ये मतभेद झाल्यामुळे कारखान्याची दुरावस्था झाली आहे.

आदिनाथ कारखान्यावरील एन सीडी सी बँकेचे चे 40 कोटी रुपये कर्ज आहे. हे आम्हाला बागल यांनी सांगितले नाही व आम्हाला अंधारात ठेवले असा आरोप बारामती ऍग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी रश्मी बागल यांच्यावर केला आहे.मात्र हे कर्ज कारखान्याच्या ताळेबंद पत्रक मध्ये स्पष्टपणे लिहिलेले असून असे असताना सुभाष गुळवे आपले अपयश झाकण्यासाठी किंवा आपल्यावर आदिनाथ बंद पडल्याचे खापर फुटू नये म्हणून वड्याचे तेल वांग्यावर काढत असल्याचा आरोप मार्केट कमिटीचे संचालक देवानंद बागल यांनी केला आहे.

आदिनाथ कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपून सुद्धा या कारखान्याची निवडणूक घेऊ नये म्हणून सरकार खात्यावर मंत्रालयातून दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे.आता जर आदिनाथ ची निवडणूक तात्काळ झाली व नवीन संचालक मंडळाने ठोस निर्णय घेतले तरच पुढील वर्षी आदिनाथ कारखाना ऊस गाळपात चालू होऊ शकतो मात्र निवडणूक पुढे ढकलून दोन-तीन महिने वाया घालवले तर तर यावर्षी सुद्धा आदिनाथ सुरू होणार नाही . शेतकऱ्यांना ऊस आपला बांधावर फेकून द्यावा लागेल किंबहुना काही शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे व आदिनाथ बंद राहिला तर खाजगी साखर कारखान्याच्या मालकांना कवडीमोल भावाने ऊस मिळणार आहे.

आदिनाथ संचालक मंडळाची मुदत संपली असून तात्काळ प्रशासनाने निवडणुका घ्याव्यात तरच नवीन संचालक मंडळ ठोस निर्णय घेऊ शकते मात्र किंबहूना आदिनाथ अडचणीत आणायचा असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जर निवडणुका पुढे जात असतील तर तर तो आदिनाथ 30 हजार सभासदाचा विश्वास घात होणार आहे –  हरिदास डांगे (माजी कार्यकारी संचालक आदिनाथ कारखाना)

माझे वडील कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांनी पायात चप्पल न घालता सातत्याने पंचवीस वर्षे प्रयत्न करून आदिनाथ ची उभारणी केली मात्र गेली दोन वर्षांपासून कारखाना बंद असल्यामुळे ऊस उत्पादकांचे फार मोठे नुकसान होत आहे. संचालक मंडळाची मुदत संपली आहे कधीही निवडणुका लागल्या तरी आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत – नारायण पाटील  – ( माजी आमदार करमाळा  )

आदिनाथ ची निवडणूक का पुढे ढकलत आहोत याचे कारण साखर आयुक्त देत नाहीत केवळ अडचण आहे असे ढोबळ उत्तर देऊन सभासदांची बोळवण केली जाते या प्रक्रियेतील झारीतील शुक्राचार्य कोण आहे हे ऊस उत्पादकांना माहित आहे येणाऱ्या काळात ऊस उत्पादक नक्कीच त्यांना त्यांची जागा दाखवतील.– महेश नरसिंग चिवटे ( शिवसेना उपजिल्हाप्रमुख )