सदाभाऊ खोत विधान परिषद निवडणुकीत निवडून कसे येणार ? चंद्रकांत पाटलांनी सांगितले गणित

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने (bjp) पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. भाजपच्याच नेत्यांना उमेदवारी दिल्याने मित्रपक्षांनी भाजपवर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (vinayak mete) यांनी तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांना भेटून जाहीर नाराजीही व्यक्त केली. या सर्व घडामोडी घडत असताना आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारीला भाजपने समर्थन दिले आहे.

आधीच पाचव्या उमेदवाराला मते कमी पडत असताना भाजपने सदाभाऊ खोत यांना निवडणूक मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजपच्या पाच अधिकृत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर खोत यांनीही आज अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

दरम्यान, सदाभाऊ खोत हे निवडणून कसे येणार याबाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) म्हणाले, सदाभाऊ खोत यांना भाजपचा पाठिंबा असेल. ते जरूर निवडून येतील. सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. शेतकऱ्यांतचे प्रश्न ते हिरीरीने मांडतात. त्यांचा विधीमंडळातील सहभाग हा राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व असेल. त्यांनी एसटी कामगारांच्या प्रश्नांसाठीही आझाद मैदानावर आंदोलन (Azad Maidan movement) केलं. त्यामुळे त्यांच्यासारख्या रणझुंजार नेत्याला आमदार सदसदविवेकबुद्धीला स्मरून मतदान करतील असं पाटील म्हणाले.

भाजपकडे हक्काची ११३ मते आहेत. त्यामुळे भाजपचे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर पाचव्या उमेदवारासाठी महाविकास आघाडीला समर्थन असलेल्या २२ मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यातच सदाभाऊ खोत यांनाही उमेदवारी देत भाजपने डाव टाकला आहे. पण मतांची जुळवाजुळव कशी होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.