‘तू दिल्लीत सापडलास तर तुला AK47ने उडवून टाकेन’, संजय राऊत यांना बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली- खासदार आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना आणखी एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीने ‘मी तुला सिद्धू मूसेवाला सारखा मारेन’ असा मेसेज केला होता. यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून त्याचा तपास चालू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

‘जर तू दिल्लीत सापडलास तर तुला AK47 ने उडवून देईन, सिद्धू मूसेवालासारखा मर्डर केस होईल’, अशी उघड धमकी संजय राऊत यांना मेसेजमध्ये देण्यात आली आहे. ‘सलमान आणि तू फिक्स आहेस’, असे लिहित लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. तो मजकूर संदेश म्हणून प्राप्त झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मेसेज पाठवणारी व्यक्ती पुण्याची असल्याची माहिती आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, ‘तुला मारुन टाकेन, हिंदुविरोधी, दिल्लीत भेटू, सिद्धू मुसेवालाप्रमाणे मी तुला AK47 ने उडवून देईन.’ या धमकीभऱ्या संदेशानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.