मेहुणे.. मेहुणे..! रितिकाच्या भावाच्या लग्नासाठी कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेतून बाहेर

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका (ODI Series) खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा धाकड खेळाडू आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या वनडेतून बाहेर राहणार आहे. यामागचे कारण समोर आले आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पहिली वनडे खेळणार नाही. रोहितच्या जागी हार्दिक पांड्या भारतीय संघाचे नेतृत्व करेल. माध्यमांतील वृत्तांनुसार, रोहित शर्माने त्याचा मेहुणा कुणाल सजदेहच्या (Kunal Sajdeh) लग्नात सहभागी होण्यासाठी पहिल्या सामन्यातून ब्रेक घेतला आहे. रोहितची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) हिने हळदी समारंभाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मात्र, रोहित शर्मा शेवटच्या दोन वनडेसाठी उपलब्ध असेल. हार्दिकच्या कर्णधारपदाबद्दल बोलायचे झाले तर, पांड्या वनडे संघाचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ असेल. मात्र, टी-20 सामन्यात पांड्याने टीम इंडियाची कमान सांभाळली आहे. पंड्याने 11 टी-20 सामन्यांमध्ये नेतृत्व केले असून त्यापैकी 8 सामने जिंकले आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना 17 मार्च रोजी मुंबईत खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा वनडे सामना 19 मार्चला विशाखापट्टणममध्ये तर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे 22 मार्चला चेन्नईत खेळवला जाईल.