पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा करणाऱ्या शंभूराज देसाईंना संजय राऊत यांचे छातीठोक प्रत्युत्तर

मुंबई: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली टीका शिंदे गटाच्या काही नेत्यांना पचली नाही. कर्नाटकच्या महाराष्ट्राप्रती वाढत्या हालचालींवरून शिंदे सरकारवर टीका करताना संजय राऊत यांनी ‘षंढ’ हा शब्द वापरला. या टीकेला उत्तर देताना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी राऊत यांना पत्राचाळ प्रकरणावरून पुन्हा तुरुंगात डांबण्याचा इशारा दिला. ज्यावर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

‘मोठ्याने बोलायचं, बाह्या सावरून बोलायचं, ही राऊत यांची बोलायची पद्धत कुणीही सहन करणार नाही. संजय राऊत तोंड आवरा. साडे तीन महिन्यांचा आराम करून आलायत. तुमच्या बडबडण्यावरून बाहेरचं वातावरण तुम्हाला सुट होत नाही. पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये, अशी वक्तव्य टाळावीत’, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला होता.

यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, ‘मंत्री महोदय ही सरळ सरळ धमकी समजायची काय? महाराष्ट्राची बाजू लढणारे या सरकारचे शत्रू आहेत. सरकार अस्मितेच्या प्रश्नावर गप्प आहे. म्हणून जनता गप्प बसणार नाही.’

‘शिवरायांचा अपमान सरकार सहन करत आहे. सीमावादावर महाराष्ट्राला कर्नाटक आव्हान देत आहे. यावर प्रश्न विचारले की संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा. कायदा, न्यायालये, तपासयंत्रणा खिशात आहेत असेच शंभूराजे देसाई आणि चंद्रकांत बावनकुळे यांना म्हणायचे आहे का? कायदा आणि न्यायालये दबावाखाली आहेत, हे पुन्हा सिद्ध झाले. सत्य बोलणारे तुरुंगात जातील.. हाच अर्थ. मी तयार आहे.!!’, असे छातीठोक प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे.