Jayant Patil | शरद पवार झुकत नाहीत म्हणून त्रास दिला जात आहे; जयंत पाटील यांचा अजब दावा 

Jayant Patil : शरद पवार (Sharad Pawar) झुकत नाहीत म्हणून ते नको आहेत, शरद पवार हो म्हणत नाहीत म्हणून त्यांचा त्रास होत आहे, शरद पवार तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागत नाहीत म्हणून अडचण केली जात आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सत्ताधारी पक्षावर केला.

आजपासून राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी विजय निश्चय दौऱ्याची सुरुवात सातारा जिल्ह्यातील पाटण येथून झाली. यावेळी जयंत पाटील बोलत होते.

जयंत पाटील उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, महाराष्ट्रात ज्या ठिकाणी आपण लोकसभेच्या जागा लढवणार आहोत, त्या सर्व ठिकाणांचा दौरा पाटणपासून सुरू केलेला आहे. पुढे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. आपला पक्ष फुटून काही सहकारी सत्तेत सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रामध्ये जी राजकीय संस्कृती होती, ती यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) साहेबांनी घालून दिलेली होती. पण आज महाराष्ट्राची संस्कृती बिघडलेली आहे आणि लोकांना फोडाफोडी करून सत्तेत जाण्याचा मोह हा काही कमी होताना दिसत नाही. सत्ता व पैसा याचे एक विचित्र सूत्र आणि नातं महाराष्ट्रात सत्तेत बसणाऱ्या लोकांनी तयार केलेले आहे असे म्हटले.

राज्याच्या कायदा सुव्यवस्थेबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, व्यवसायिक व्यवसाय करतात हे समजू शकतो. पण आता आमदारही व्यवसायिक झालेले आहेत, ते सुद्धा जमिनी खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. आमदारांच्या जमिनीत जर कोणी दुसरा घुसला तर त्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो व सकाळी बातमी येते की ज्यांनी गोळीबार केले त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलेले आहे. महाराष्ट्रातच नाही तर बिहारमध्ये देखील पोलीस स्टेशनमध्ये कधी गोळीबार झाला असेल, असे मला वाटत नाही. आपण म्हणायचो की कुठे नेलाय महाराष्ट्र? महाराष्ट्राचा काय बिहार करणार आहे का? आता ते वाक्य रद्द करा महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे. त्यांची सुधारणा झाली आहे पण आमची अधोगती एवढी झाली आहे की एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री राज्याला आहे पण यांना राज्य आवरत नाही अशी यांची परिस्थिती आहे. राज्य करणार्‍यांचा लोकांवर, कार्यकर्त्यांवर व सत्तेत असलेल्या आमदारांवर कोणताही प्रभाव नाही याचे हे उत्तम उदाहरण आहे असा टोला त्यांनी लगावला.

सत्तेत असणाऱ्या सगळ्यात मोठ्या पक्षाचा आमदार मुख्यमंत्र्यांच्या संघटनेतील पदाधिकाऱ्यावर गोळीबार करतो आणि त्यानंतर मुलाखत देताना सांगतो की मुख्यमंत्र्यांनी आपल्या काळामध्ये गुन्हेगार घडवण्याचे काम केलेले आहे व मुख्यमंत्र्यांना मी कोट्यावधी रुपये दिलेले आहेत त्यांनी माझ्याकडून करोडो रुपये घेतले आहेत, आता ED कोणाकडे गेली पाहिजे? सत्तेमधलेच मंत्री एक दुसऱ्याला खालच्या पातळीची भाषा वापरत आहेत, हे काय चाललंय महाराष्ट्रात? असा सवाल त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या –

भाजप आमदाराच्या गोळीबारामुळे आणि मुख्यमंत्र्यांवरील आरोपांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघे मिळून मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात झुंझवत आहेत – Nana Patole

Atif Aslam | “पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करून दाखवाच”, मनसेचं बॉलिवूडकरांना थेट आव्हान