अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा निकटवर्तीय संतोष सावंतला अखेर भारतात आणलं, दोन दशकापासून होता फरार

नवी दिल्ली- छोटा राजनचा (Chhota Rajan) सहकारी संतोष सावंत (Santosh Sawant) याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सिंगापूरमधून हद्दपार केले आहे. सिंगापूरमध्ये राहणारा सावंत हॉटेल व्यवसायाच्या नावाखाली छोटा राजनसाठी काम करत होता. संतोष सावंत हा राजनचे फायनान्सचे काम पाहत असे आणि दोन दशकांपासून तो फरार होता. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआय प्रथम संतोष सावंतला ताब्यात घेईल, त्यानंतर त्याला गुन्हे शाखा ताब्यात घेईल. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, सावंत दिल्लीत दाखल होताच सीबीआयने त्याला ताब्यात घेतले आहे.

संतोष सावंत हा सुमारे 22 वर्षांपासून राजन टोळीशी संबंधित आहे. सावंत हा छोटा राजनच्या जवळच्या लोकांपैकी एक असून सावंत हा डीके राव यांच्यानंतर टोळीत नंबर दोनवर होता. 2000 मध्ये छोटा राजनवर हल्ला झाला होता. त्यानंतर रवी पुजारी, हेमंत पुजारी, बंटी पांडे आणि विजय शेट्टी असे त्याचे जवळचे मित्र त्याला सोडून गेले. पण सावंत यांनी छोटा राजनची साथ सोडली नाही आणि लवकरच तो राजनच्या विश्वासातील माणूस बनला.

डीके राव यांच्याकडे टोळीशी संबंधित गुन्ह्यांच्या कारवाया घडवून आणण्याचे काम होते, तर सावंत राजनच्या काळ्या पैशाचे खाते शोधण्यास सुरुवात केली. राजन कंपनीचे प्रॉपर्टी डीलिंग आणि फायनान्स त्याने पूर्णपणे ताब्यात घेतले होते. 2000 मध्ये त्याच्या प्रत्यार्पणाची कागदपत्रे सुरू झाली. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही आली होती.