…मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका! संभाजीराजेंच्या पत्नी चिडल्या; काळाराम मंदिरात काय घडलं?

नाशिक- छत्रपती शिवाजी महाराजांचे कोल्हापूरचे वंशज व माजी खासदार संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी ( Chhatrapati Sambhajiraje Wife) संयोगीता राजे (Sanyogeetaraje Chhatrapati) यांना वेदोक्त मंत्रोच्चारणास विरोध करण्यात आल्याचं समोर आलं आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरात हा धक्कादायक प्रकार घडला असून यामुळं सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

संयोगीताराजे छत्रपती यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत आपल्या मनातील खदखद व्यक्त करत एकूणच घटनेवर टीका केली आहे. काल रामनवमीच्या निमित्ताने संयोगीताराजे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी पुजा करताना महंतांनी ही पूजा पुराणेक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. यास संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले. त्यांनी त्यास ठामपणे विरोध केला व स्वत: महामृत्युंजय मंत्राचा जप केला. त्यास महंतांनी आक्षेप घेतला. तुम्हाला वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही, असं सांगण्याचा प्रयत्न केला.

महंतांच्या या भूमिकेमुळं संयोगीताराजे संतापल्या. ‘ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही नियम लावत आहात, ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका, अशा शब्दांत त्यांनी महंतांना खडसावलं. ‘परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असं सुनावून त्यांनी तिथंच रामरक्षेचं पठणही केलं.

या प्रसंगाबद्दल संयोगीताराजे यांनी आपल्या भावना व्यक्त आहेत. ‘शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही, असा प्रश्न माझ्या मनात आला. अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे. अजूनही खूप प्रवास बाकी आहे… अजून खूप चालावं लागणार आहे… हे श्रीरामा, त्यासाठी बळ दे आणि सर्वांना ज्ञान दे! स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणार्‍या, परमेश्वराच्या नावानं केवळ स्वार्थ साधू पाहणार्‍यांना सद्बुद्धि दे… हीच आमची प्रार्थना,अन हेच आमुचे मागणे, माणसानं माणसाशी माणसासम वागणे…, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

https://youtu.be/SbElFGzZU8I