भाजप नेत्यांवर कारवाई होत नसल्याने सेना-राष्ट्रवादीत धूसफूस

मुंबई : तीन भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र येत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. मात्र नेहमीच कोणत्यातरी मुद्यावरून या तिन्ही पक्षात धुसफूस पाहायला मिळते. असाच काहीसा प्रकार घडत असल्याची सध्या कुजबुज सुरु असून भाजप (bjp) नेत्यांविरोधात पुरावे देऊनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादीत (ncp) शीतयुद्ध सुरु झालं आहे.

राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्याकडून भाजप नेत्यांवर कोणतीच कारवाई केली जात नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची मालमत्ता जप्त केल्यानंतरही गृहखात्याकडून विरोधकांवर कारवाई केली जात नसल्याने शिवसेनेनेत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादीकडे गृहखाते शिवसेनेला देण्याची मागणी केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मागच्याकाळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखाते होते, त्याच धर्तीवर मुख्यमंत्र्यांकडेही गृहखाते असावे अशी शिवसेनेची मागणी आहे. शिवसेनेने गृहखाते आपल्याकडे मागितल्याच्या पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री दिलीप वळसेपाटील हे आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना भेटले आहेत. राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या मागणीवर काय प्रतिक्रिया येते याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.