‘हे अनुभवी नेत्यांचे सरकार हा असा बावळटपणा अत्यंत नियमितपणे का करते, ते आजतागायत कळू शकलेले नाही’

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उद्याच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील आपत्ती व्यवस्थापन कायदा तसंच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध पूर्णपणे उठवण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे यांनी काल या बैठकीत दिली.

गेल्या दोन वर्षांपासून राज्याच्या जनतेनं कोरोना विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला असून या नवीन वर्षी जुनं सगळं मागे सारुन नवीन सुरुवात करुयात असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. कोरोना संसर्गाचा धोका भविष्यात पुन्हा उद्भवू नये यासाठी नागरिकांनी आरोग्य विषयक नियम पाळून काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. राज्यातील डॉक्टर्स, कोरोना योद्धे, पोलीस यंत्रणा, प्रशासन आणि नागरिकांनी आतापर्यंत केलेल्या सहकार्यासाठी सर्वांचे आभारही त्यांनी यावेळी मानले. सर्वांनी सणांच्या आणि उत्सवांच्या काळात पाळलेल्या संयमाचं देखील मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं.

निर्बंध हटवल्यामुळे आता प्रवासात, रेस्टॉरण्ट, रेल्वे यामधल्या उपस्थितांच्या संख्येवर कोणतेही बंधन नाही त्याचप्रमाणे दुहेरी लसीकरणाची सक्तीही मागे घेतली आहे. यापुढे मास्क घालणे हे ऐच्छिक असून त्याची सक्ती नाही अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली. आगामी सर्व सण उत्सव पूर्ण उत्साहात साजरे करता येतील असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर पत्रकार हेमंत देसाई (Hemant Desai) यांनी ठाकरे सरकारला चिमटे काढले आहेत. ते म्हणाले, गुढीपाडवा निर्बंधमुक्त पद्धतीने आणि उत्साहात साजरा करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. ही घोषणा करायचीच होती, तर ती आधी का केली नाही? ‘हिंदूंच्या सणांवर तेवढे मविआ सरकार बंधने घालते’, अशी बकवास टीका करण्यासाठी सरकारने विरोधी पक्षांना वाव देण्याची गरज काय होती? हे अनुभवी नेत्यांचे सरकार हा असा बावळटपणा अत्यंत नियमितपणे का करते, ते आजतागायत कळू शकलेले नाही… ही एकप्रकारची गूढ-यात्राच आहे! असं ते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.