महाराष्ट्रभर निघणार लखीमपुर खेरी किसान शहीद अस्थिकलश यात्रा!

पुणे : उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना आणि एका पत्रकाराला भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. अजय मिश्र टेनी यांच्या गुंडांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडून ठार मारले. बारा पेक्षा अधिक शेतकरी भर रस्त्यात गाड्यांखाली चिरडण्यात येऊन जबर जखमी झाले. शेतकरी आंदोलनाच्या इतिहासातील या अत्यंत काळयाकुट्ट घटनेचा धिक्कार करण्यासाठी व संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनात आजवर शहीद झालेल्या ६३१ शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आदरांजली वाहण्यासाठी विविध संघटनांकडून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये किसान शहीद अस्थिकलश यात्रा काढण्यात येणार आहे.

देशभर अशा यात्रा काढून शेतकरी आंदोलन अधिक व्यापक करण्याचे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केले आहे. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विविध संघटनांच्या वतीने ही यात्रा महाराष्ट्रात काढण्यात येत आहे. लखीमपूर खेरी येथील शहिदांच्या अस्थी असलेले कलश महाराष्ट्रात आणण्यात आले असून शेतकऱ्यांच्या चळवळीचे ऊर्जास्थान असलेल्या पुण्यातील महात्मा जोतीराव फुले यांच्या वाड्यातून या अस्थिंच्या कलशांच्या यात्रा दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू होतील. विविध संघटनांच्या माध्यमातून विविध मार्गांवरून राज्यभर मिरवणुका व सभा आयोजित करत, राज्यातील जनचळवळींच्या विविध शक्तिस्थानांना भेटी देत या यात्रा दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबईच्या हुतात्मा चौकात पोहोचतील व मुंबईत भव्य सभा घेऊन या अस्थी महाराष्ट्राच्या मातीत विलीन करण्यात येतील.

संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली तीन कृषी कायदे रद्द करा, किफायतशीर आधारभावाची हमी देणारा केंद्रीय कायदा करा आणि शेतकरी व सामान्य ग्राहकांना उद्ध्वस्त करणारे वीज विधेयक मागे घ्या या प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीत गेल्या ११ महिन्यापेक्षा अधिक काळापासून शेतकऱ्यांचे ऐतिहासिक आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांनी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आम्हाला संधी मिळू द्या मग शेतकऱ्यांना कसे सरळ करतो पहा, अशी धमकी त्यांनी दिली होती. शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून ही धमकी त्यांनी क्रूरपणे खरी करून दाखवली आहे.

तीन कॉर्पोरेटधार्जिणे कृषी कायदे अंमलात आणण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाने उघडपणे हिंसेचा मार्ग स्वीकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजूनही या घटनेचा साधा निषेधही केलेला नाही. केंद्रीय मंत्रिमंडळातून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांची हकालपट्टी केलेली नाही. त्यांना ३०२च्या गुन्ह्याखाली अटकही करण्यात आलेली नाही. उलट भाजपचे एक नेते व हरियाणाचे मुख्यमंत्री श्री. मनोहर लाल खट्टर यांनी उत्तर प्रदेशची घटना ताजी असतानाच हिंसा भडकविण्याचे उघड उघड आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चोपून काढण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी हातात काठ्या घ्याव्यात, हजार हजार कार्यकर्त्यांनी हातात काठ्या घेऊन शेतकऱ्यांना बदडून काढावे, प्रसंगी जेलमध्ये जायची तयारी ठेवून शेतकऱ्यांना चोपून काढावे असे आदेश त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी हरियाणाचे मुख्यमंत्री श्री. मनोहर लाल खट्टर यांचा मतदारसंघ असलेल्या कर्नालमध्ये उपविभागीय अधिकारी आयुष सिन्हा यांनी शेतकऱ्यांची सरळ डोकी फोडा असे आदेश पोलिसांना दिले होते. अस्थिकलश यात्रेच्या माध्यमातून भाजप अवलंबत असलेल्या या हिंसेचा तीव्र धिक्कार करण्यात येणार आहे. शिवाय भाजप प्रणीत केंद्र सरकार ज्या कारणांसाठी तीन विवादित कृषी कायदे लादून टोकाचा रक्तपातपूर्ण दुराग्रह करत आहे त्या कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांचा धिक्कारही या यात्रेत करण्यात येणार आहे.

हे ही पहा: