पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करेन – पवार

मुंबई  – आपण राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याची व पुन्हा एकदा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे शरद पवार (Sharad pawar)  यांनी पत्रकार परिषदेत आज जाहीर केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात जोरदार आनंद व्यक्त केला.

दिनांक २ मे २०२३ रोजी ‘लोक माझे सांगाती’ या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर या जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भूमिका होती. परंतु मी घेतलेल्या निर्णयाने जनमानसामध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे ‘सांगाती’ असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरिता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. देशभरातून व विशेषतः महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी आग्रही विनंती केली असेही शरद पवार म्हणाले.

‘लोक माझे सांगाती’ हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास याने मी भारावून गेलो. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे असे ठरवले, या निर्णयाचा देखील मान राखून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे असे शरद पवार यांनी जाहीर केले.

मी पुन्हा एकदा अध्यक्षपद स्वीकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते, असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करेन अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

आपण सातत्याने दिलेली साथ हीच माझी खरी प्रेरणा आहे. माझ्या जीवनातील यश-अपयशात, सर्व प्रकारच्या आव्हानांशी मुकाबला करतेवेळी आपण माझे सांगाती राहिलात याबद्दल शरद पवार यांनी ऋण व्यक्त करतानाच पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे पुन्हा एकदा जाहीर केले.

या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, केरळचे आमदार के. थॉमस, पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले आदींसह पक्षाचे आमदार, प्रवक्ते, पदाधिकारी उपस्थित होते.