चांगली गोष्ट आहे त्यांना अजूनही सत्तेत असल्यासारखे वाटते, पवारांचा फडणविसांना टोला

मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर येथे आमदार मंदा म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक राजकीय चर्चांना उधाण आणणारे वक्तव्य केले. ‘मला एकही दिवस जाणवले नाही, की मी मुख्यमंत्री नाही. मला आजही असे वाटते की मी मुख्यमंत्रीच आहे’ असे वक्तव्य त्यांनी केले होते.

फडणवीसयांच्या या विधानाचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चांगलाच संचार घेतला आहे. ते म्हणाले, एनसीबीची बाजू मांडणाऱ्यांमध्ये पुढे येणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आम्हाला एनसीबीचा अभिमान आहे. यंत्रणेचा अभिमान असणे ठिक आहे. पण कालच्या भाषणात त्यांनी सांगितले की, मी अजूनही मुख्यमंत्री असल्याचे वाटते. चांगली गोष्ट आहे त्यांना अजूनही सत्तेत असल्यासारखे वाटते. असा टोला पवारांनी लगावला आहे.

तर, माझा अनुभव वेगळा आहे. मला मी कधी मुख्यमंत्री होतो ते लक्षात राहत नाही असा चिमटा पवारांनी फडणवीसांना काढला. मुख्यमंत्री पदावर काम केल्यानंतर पुढच्यावेळी मी विरोधी पक्षात काम केले आहे. त्यावेळी प्रशासनाने सत्तेवर असताना आपल्याला दिलेले अहवाल आणि जमिनीवरची वास्तवता वेगळी असते. विरोधात असताना लोकांमध्ये फिरल्यानंतर त्याचा अभ्यास होतो असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.