किरीट सोमय्यांची फडणवीसांच्या नावाने ३०० कोटींची वसुली; राऊतांचा नवा आरोप

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने त्यावेळी शेकडो कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस, अमित शहा, तसेच काही केंद्रीय मंत्र्यांच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी लोकांना धमक्या देऊन वसुली करीत होते. तसेच पुनर्वसनाच्या नावाखाली त्यांनी महाघोटाळा देखील केला आहे, असं संजय राऊत यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्यात किरीट सोमय्या आणि संजय राऊत वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या आणि खासदार संजय राऊत यांच्या सध्या आरोप- प्रत्यारोपाची मालिका सुरू आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण एक वेगळ्याच वळणावर गेले आहे. पवई पेरूबा पास्कोली या १३८ एकराच्या जागेवर पुनर्वसनाच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे.

या प्रकरणात ४३३ बोगस नावे जोडले गेले आहेत. ही लोक कुठुन आलीत, त्यांची कागदपत्रे, आणि आधार कार्ड हे सर्व माझ्या जवळ आहेत. तसेच त्यांच्याकडून प्रत्येकी ४० लाखांपेक्षा अधिक रूपये घेतले आहे. त्यामुळे हा घोटाळ्याच्या प्रकरणात जवळपास २०० ते ३०० कोटी रूपयांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने त्या काळात हा सगळा घोटाळा किरीट सोमय्यांनी केला आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितले.

ते पुढे बोलताना म्हणाले की, आता किरीट सोमय्याच स्वतः ची चप्पल स्वतः च्या तोंडावर मारणार आहेत. तसेच त्यांची भविष्यात लोक देखील धिंड काढणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उद्देशून म्हणाताना ते म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्या बाजूने जे नेतेमंडळी बोलत आहेत. तुम्ही जरा जपून रहा. कारण त्याच्या सोबत तुमची देखील लोक धिंड काढतील.