राज्यातील सामाजिक ऐक्याला धक्का लावण्याचा प्रयत्न होतोय; याला बळी पडू नका – शरद पवार

मुंबई   – मला नास्तिक म्हणता परंतु मी तुमच्यासारखे देव धर्माचे प्रदर्शन कुठे करत नाही. मी १३-१४ वेळा निवडणूकीचा नारळ कुठे फोडतो ते बारामतीकरांना जाऊन विचारा…एकच ठिकाण आहे… एकच मंदिर आहे. त्याचा आम्ही गाजावाजा करत नाही. माझ्यापुढे प्रबोधनकार ठाकरेंचा आदर्श आहे. प्रबोधनकारांनी देव धर्माच्या नावाने बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर सडकून टिका केली आहे. गैरफायदा घेणार्‍याला ठोकून काढण्याचे काम केले आम्ही सगळे प्रबोधनकार वाचतो मात्र कुटुंबातील वाचतात असं नसावं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल ठाण्यात शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. राज ठाकरेंच्या या आरोपाला शरद पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना ‘टोले’ जंग उत्तरे दिली. एखादी व्यक्ती वर्ष – सहा महिन्यात एखादे वक्तव्य करत असेल तर ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पण पत्रकार विचारत आहेत, म्हणून त्यावर मत व्यक्त करतोय असे शरद पवार म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chatrapati Shivaji mahraj) मी नाव घेत नाही, असा उल्लेख त्यांनी केला. पण दोनच दिवसापुर्वी मी अमरावतीत होतो. त्याठिकाणचे माझे संपुर्ण भाषण ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानावर जवळपास २५ मिनिटे बोललो. अर्थात मला रोज सकाळी लवकर उठून वृत्तपत्र वाचनाची सवय आहे. त्यासाठी मला लवकर उठावं लागतं. खुपदा वृत्तपत्रात काय काय लिहिलंय हे न वाचता एखादा वक्तव्य करत असेल तर त्याला दोष देणार नाही असा जबरदस्त टोला शरद पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

फुले-शाहू-आंबेडकरांबाबतही उल्लेख केला जातो त्याचा अभिमान आहे मला असे सांगतानाच दुसरी गोष्ट त्यांना माहिती असली पाहिजे की, या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिले काव्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी रचले होते.या तिघांचा उल्लेख करणे म्हणजे शिवछत्रपतींच्या विचारांची मांडणी करण्यासारखे आहे असेही शरद पवार म्हणाले.

आज खऱ्या अर्थाने महागाई, दरवाढ, बेरोजगारी हे जिव्हाळ्याचे प्रश्न होते. ज्यांनी एवढं मोठं काल भाषण केले त्यांनी सामान्य जनतेच्या सुखदुःखाच्या प्रश्नाचा साधा उल्लेखही केला नाही यावरही शरद पवार यांनी टिका केली.

सोनिया गांधी आणि माझ्याबद्दल त्यांनी वक्तव्य केले. याबाबतीत माझे जाहीर मत आधीपासूनच स्पष्ट होते. सोनिया गांधी यांनी जेव्हा मी पंतप्रधान पदावर जाऊ इच्छित नाही, असे जाहीर वक्तव्य केल्यानंतर तो प्रश्न तिथेच संपला होता. आमची चर्चा त्यांच्या पंतप्रधानपदाबाबत होता, तो विषय निकाली लागल्यानंतर त्यावर चर्चा करण्याचे कारण नव्हते. त्यामुळे काँग्रेससोबत आम्ही तेव्हा गेलो आणि आजही त्यांच्यासोबत आहोत. मात्र त्याकाळात जे काही घडले, त्याचे सविस्तर वाचन केले असते तर कदाचित अशाप्रकारचे उद्गार राज ठाकरे यांनी केले नसते.

आमचा संपणारा पक्ष नसून संपवणारा पक्ष आहे, असे ते म्हणतात ते खरे आहे. संपवणारा पक्ष याची नोंद महाराष्ट्रातील मतदारांनी योग्य घेतली व खरे दाखवून दिले की, त्यांचा एकच आमदार निवडून आलेला आहे.त्यांच्या सभा मोठ्या होतात सभेला लोक जातात. त्या सभेत शिवराळ भाषा असो की नकला यातून मात्र लोकांची करमणूक होते असा सणसणीत टोला शरद पवार यांनी लगावला.

राज्यातील सामाजिक ऐक्याला धक्का लावण्याचा प्रयत्न होतोय. सांप्रदायिक विचारांची मांडणी काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत. लोकांनी याला बळी पडू नये असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले.भोंग्याबाबत राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना शरद पवार यांनी राज्यसरकार याबाबत गंभीरतेने विचार करेल असे स्पष्ट केले.