‘यासाठी सुशिक्षित मुलीच जबाबदार…’, श्रद्धा हत्याकांड प्रकरणी केंद्रीय मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली –  श्रद्धा वालकर खून प्रकरणात दर तासाला खळबळजनक खुलासे होत आहेत. एकीकडे पोलीस हैराण आहेत तर दुसरीकडे सर्वसामान्य जनता दहशतीत आहे. अनेकांनी श्रद्धाची हत्या करणाऱ्या तिच्या प्रियकर आफताब अमीन पूनावाला याला क्रूर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. अगदी राजकीय क्षेत्रातूनही या प्रकरणी प्रतिक्रिया येत असून बहुतांश नेत्यांनी आफताबवर टीका केली आहे.

अशातच केंद्रिय मंत्री कौशल किशोर यांनी या प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. केंद्रीय मंत्री कौशल किशोर (Kaushal Kishor) यांनी या हत्येसाठी केवळ सुशिक्षित मुली आणि लिव्ह इन रिलेशनशिपला जबाबदार धरले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरही जोरदार टीका होत आहे.

श्रद्धा खून प्रकरणाचा संदर्भ देत कौशल किशोर यांनी ‘न्यूज18’ ला सांगितले, “या घटना सुशिक्षित मुलींसोबत घडत आहेत. त्या विचार करतात की त्या खूप बोलक्या आहेत आणि त्यांच्यात स्वत:च्या भविष्याचा निर्णय घेण्याची क्षमता आहे. सुशिक्षित मुली यासाठी जबाबदार आहेत. मुलींनी विचार करायला पाहिजे की, त्या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये का राहत आहेत? कारण जर आई-वडीलांना त्यांचं नात अमान्य असेल, तर त्यांनी कोर्ट मॅरेज करावं आणि मग एकत्र राहावं.”