गोव्यात काँग्रेस आमदारांचा शिंदे पॅटर्न; 11 पैकी १० आमदार भाजपच्या वाटेवर

पणजी – गोव्यात काँग्रेस विधिमंडळ गटात मोठी फूट पडली असून अकरापैकी दहा आमदार विधिमंडळ गट भाजपात विलीन होण्याच्या तयारीत आहेत असे वृत्त आहे. भाजप (bjp) श्रेष्ठींकडून या विलिनीकरणाला हिरवा कंदील मिळाला असून आज संध्याकाळपर्यंत दहा आमदारांचा हा गट भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आमदार मायकल लोबो यांच्यासोबत भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या आमदारांमध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचाही समावेश आहे. भाजप प्रवेशानंतर त्यांना राज्यसभेवर स्थान दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गोवा विधानसभेत (Goa Legislature) सध्या काँग्रेसचे (Congress) अकरा आमदार आहेत. पक्षांतर बंदी कारवाई टाळण्यासाठी दोन तृतीयांश आमदार फुटीची आवश्यकता आहे. आठ आमदार पुरेसे होते, परंतु येथे ११ पैकी १० आमदार भाजपप्रवेशाच्या तयारीत आहेत अशी माहिती मिळत आहे.

सध्या विधानसभेत काँग्रेसचे ११ आमदार आहेत. परंतु त्यात देखील दोन गट असल्याचे सूत्रांकडून समजते. पहिला गट हा दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांचा आहे. यात दिलायला लोबो, केदार नाईक, ॲड. कार्लुस अल्वारिस, राजेश फळदेसाई यांचा समावेश आहे. तर, दुसऱ्या गटात संकल्प आमोणकर, आलेक्स सिक्वेरा, युरी आलेमाव, रुडाल्फ फर्नांडिस आणि एल्टन डिकॉस्टा यांचा समावेश आहे.