लोकसभा निवडणुकीत मिशन-48 यशस्वी करून दाखवण्याचा शिवसेनेचा निर्धार

shivsena:- आगामी लोकसभा निवडणुकीत मिशन -48 यशस्वी करून महाराष्ट्रातून सर्वाधिक खासदार निवडून आणण्याचा ठराव आज शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेत बहूमताने मंजूर करण्यात आला. पक्षाचे राजकीय आणि संघटनात्मक ठराव मंजूर करण्यात आले. तसेच शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियाना अंतर्गत आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणून संसदेत पाठवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

शिवसेनेची प्रीतिनिधी सभा आज मुंबईतील रामटेक बंगल्यावर पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, शिवसेना नेते रामदास कदम, आनंदराव अडसूळ, महिला नेत्या मीना कांबळी, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेनेचे पक्ष प्रतोद भरतशेठ गोगावले आणि सर्व मंत्री, खासदार, आमदार, उपनेते, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यात तीन राज्यात भाजपला घवघवीत यश मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडून बहुमताने मंजूर करण्यात आला. तसेच राज्य सरकारने आजवर केलेल्या वाटचालीबद्दल सरकारचे अभिनंदन करणारा, जी-20 परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल केंद्र शासनाचे अभिनंदन करणारा असे अन्य तीन ठरावही मंजूर करण्यात आले. याशिवाय संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णयही या बैठकीत घेण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजचा दिवस हा अत्यंत आनंदाचा दिवस असून भाजपला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. आज निकाल लागलेल्या राज्यात एनडीएचे घटक पक्ष म्हणून आपण भाजपला पाठींबा दिला असल्याचे सांगितले. राजस्थान आणि तेलंगणा या राज्यात मी स्वतः जाऊन भाजप उमेदवारांचा प्रचार केला. त्यातील चार उमेदवार या निवडणुकीत निवडून आले. तेलंगणामधील आदिलाबादचे भाजप उमेदवार पायल शंकर हे तीन वेळा पराभूत झाले होते. मात्र यावेळी मी त्यांच्या मतदारसंघात जाऊन प्रचार केल्यानंतर त्यांचा विजय झाला. बाहेरील राज्यात शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून आपल्याबद्दल कुतूहल असून त्यांचेच चित्र राजस्थान आणि तेलंगणा येथे पहायला मिळाले. मोदींवर टीका करणारे पक्ष हे वैयक्तीक स्वार्थ आणि मोदी द्वेष या भावनेतून एकत्र आले असून जनता त्यांच्या पाठीशी नसल्याचे आजच्या निकालांनी दाखवून दिले असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

शिवसेनेची प्रतिनिधी सभा आज पार पडली असून आता आपल्याला नियमानुसार काम करायचे आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने आपल्याला दिल्यानंतर आता या पक्षाची नव्याने बांधणी करायची आहे. राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला यांना दिलासा देणारे अनेक निर्णय आपण घेतले असून एक रुपयात पीकविमा, विनामूल्य आरोग्य सेवा, शेतीला दुप्पट नुकसान भरपाई आणि 700 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि लेक लाडकी असे काही अतिशय पथदर्शी निर्णय आपण घेतले आहेत.त्यामुळे हे निर्णय आता लोकांपर्यंत पोहचवून जास्तीत जास्त लोकांना त्यांचे लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

राज्यात शिवसेनेच्या माध्यमातून वेगानं संघटनात्मक बांधणी सुरू करावी. काम करणारे आणि जनाधार असलेले पदाधिकारी निवडून त्यांची नियुक्ती करावी, लोकांशी संपर्क वाढवून त्यांच्या सुख दुःखात सामील व्हावे. मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकारी यांनी लोकांचे प्रश्न जाणून ते सोडवावेत, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. राज्यात आगामी काळात महिलांसाठी, तरुणांसाठी काही महत्वाचे निर्णय घेतले जाणार असून ते लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले.

शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ

शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वतःच्या प्रतिकात्मक सदस्य नोंदणी अर्जावर स्वाक्षरी घेऊन या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली. तसेच शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते यांनीही फॉर्मवर सही करून पक्षाची प्राथमिक सदस्यता घेतली. प्रत्यक्ष सदस्य नोंदणी अर्ज भरून देणे किंवा 7703077030 या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल देऊन येणाऱ्या लिंक वरील फॉर्म भरून पक्षाचे सदस्यत्व घेणे किंवा क्यू आर कोड स्कॅन करून फॉर्म भरून त्यानंतर ओळखपत्र डाउनलोड करून सदस्यत्व घेणे असे तीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जास्तीत जास्त लोकांना शिवसेनेचे प्राथमिक सदस्य करून पक्षाशी जोडण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी पक्षातील सर्व सहकार्यांना केले.

महत्वाच्या बातम्या-

तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी- धीरज घाटे

विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मान्य, लोकसभेला चित्र बदलून काँग्रेसच विजयी होईल – नाना पटोले

मोदींच्या गॅरेंटीवर जनतेचा अढळ विश्वास; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा