शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं; केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे न्यायालयात

Mumbai – निवडणूक आयोगानं शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर, आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे, असं नाव, तसंच मशाल हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. मात्र, निवडणूक चिन्हासाठी त्यांनी दिलेले तिन्ही पर्याय निवडणूक आयोगानं फेटाळले असून, त्यांना नव्यानं तीन पर्याय द्यायला सांगितलं आहे.

दरम्यान शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवल्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.तर यासंदर्भात आपलं म्हणणं ऐकून घ्यावं, असं कॅव्हेट एकनाथ शिंदे यांनी दाखल केलं आहे.(Shiv Sena party name and symbol frozen; Thackeray in the court against the decision of the Central Election Commission)

दरम्यान मुंबईतल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल मातोश्री इथं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या निवडणुकीसाठी शिवसेनेला पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी माजी मंत्री अमित देशमुख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश प्रवक्ते राजु वाघमारे उपस्थित होते.