विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांनी आपापलं बघावं – शिवसेना

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची अनेक मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या पियुष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिकांचा विजय (BJP’s Dhananjay Mahadik’s victory) झाला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे.

दरम्यान, या निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांनी भाजपला मतदान केल्याने हा पराभव झाल्याचं बोललं जात आहे. विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांनी आपापलं बघावं अशी भूमिका शिवसेनेने घेतली असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून समोर येत आहे.न्यूज 18 लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला एकरुप भूमिका दाखवली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक अपक्ष आमदारांनी भाजपला मतदान करून शिवसेनेच्या दूसऱ्या उमेदवाराला पाडण्यात हातभार लावला. यामुळेच शिवसेना आता महाविकास आघाडीतील इतर पक्षांवर विश्वास ठेवायला तयार नाहीये अशी माहिती समोर येत आहे.