संभाजीराजे नव्हे तर शिवसेना संजय पवारांना उमेदवारी देणार?

कोल्हापूर : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांचा राज्यसभेसाठी शिवबंधन (shivbandhan ) हाती बांधण्यास नकार असल्याचे समजते. त्यामुळे आता शिवसेनेकडून उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. सुरूवातीला ज्येष्ठ नेत्यांना या जागेवर संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. पण आता कोल्हापूरातीलच संजय पवार(sanjay Pawar) हे नाव अचानक चर्चेत आलं आहे.

कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार हे कट्टर शिवसैनिक ओळखले जातात. 1989 पासून ते कोल्हापूरमध्ये शिवसेना पक्षात कार्यरत आहेत. बेळगाव सीमाभागात मराठी बांधवावर होणाऱ्या कानडी अत्याचाराविरोधात रस्त्यावरच्या आंदोलनात संजय पवार हे नेहमी असतात. 1990, 1996, आणि 2005 असे तीन वेळा ते कोल्हापूर महापालिकेत शिवसेना नगरसेवक राहिले आहेत. 2005साली त्यांनी कोल्हापूर महापालिकेत विरोधी पक्ष नेता म्हणून काम पाहिलं आहे.

तालुका प्रमुख, शहर प्रमुख ते जिल्हा प्रमुख असं पद भूषवणारे संजय पवार हे शिवसेनेतील जुने आणि निष्ठावंत शिवसैनिक आहेत. 2008पासून ते शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख आहेत. 2018 ते २2020 या काळात त अण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष राहिले आहेत. या पदाला राज्यमंत्री दर्जा असतो.