सत्ता वाचवण्यासाठी शिवसेनेची धडपड; उचलले आता ‘हे’ मोठे पाऊल

मुंबई – शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय भूकंप झाल्याचे पाहायला मिळत आहे. गुवाहाटीत तळ ठोकून बसलेल्या बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड केली आहे. सोबतच महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे यांच्या बंडाळीमुळे नवीन समीकरणे तयार होताना दिसत आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे यांचा गट भाजप बरोबर हात मिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भाजपकडून (BJP) एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाला मंत्रिपदाची ऑफर्स देण्यात आलेली आहे अशी देखील माहिती समोर येत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर  शिवसेनेने (Shivsena) महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींना पत्र लिहून बंडखोर शिवसेना आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. या पत्रात शिवसेनेने 12 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे, जेणेकरून ते फ्लोअर टेस्टमध्ये (Floor test) मतदान करू शकत नाहीत. शिवसेनेने जाहीर केलेले विधिमंडळ पक्षनेते अजय चौधरी (Legislative Party Leader Ajay Chaudhary) यांनी हे पत्र महाराष्ट्राच्या उपसभापतींना पाठवले आहे. त्याचवेळी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव यांच्या प्रयत्नावर पलटवार करत तुम्ही कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहात, आम्हालाही कायदा माहीत आहे, असे म्हटले आहे.

शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते अजय चौधरी यांनी विधानसभेच्या उपसभापतींना पत्र लिहून शिवसेनेच्या 12 बंडखोर आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. शिवसेनेच्या बैठकांना उपस्थित न राहिल्याने कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, भरत गोगवाले, संजय शिरसाठ, यामिनी जाधव, अनिल बाबर, लता सोनवणे, तानाजी सावंत, बालाजी किन्हीकर, प्रकाश सुर्वे आणि महेश शिंदे (Eknath Shinde, Abdul Sattar, Sandipan Bhumare, Bharat Gogwale, Sanjay Shirsath, Yamini Jadhav, Anil Babar, Lata Sonawane, Tanaji Sawant, Balaji Kinhikar, Prakash Surve and Mahesh Shinde) या १२ आमदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.