शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली त्यांच्या कर्माने, पण आदित्य आणि रोहित बाळाचा टाहो भाजपच्या नावाने का?

राम कुलकर्णी : एका भविष्यकाराने सांगुन टाकलं की, राजकारण, क्रिकेट आणि पावसाचं भविष्य कुणीच कधी सांगु शकत नाही. त्याचा प्रत्यय सद्या महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या वर्षापासुन येताना दिसतो. प्रत्येक माणुस असो किंवा पक्ष आपल्या कर्माने तथा त्याच्या नेतृत्वाने वाटचाल सुरू असते. पण जेव्हा अचानक खड्डे पडतात त्याचा दोष नेतृत्व कर्मावर जावु शकतो. अनेकदा जैसी करणी, वैसी भरणी किंवा पेरलं ते उगवतं अशी वाक्य याप्रसंगी लागु होतात.

मागच्या वर्षी शिवसेना फुटली, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) 40 आमदारांना घेवुन बाहेर पडले. त्याचा वर्धापन दिन साजरा होताना राष्ट्रवादी पक्ष फुटला 40 आमदार घेवुन अजितदादा (Ajit Pawar) बाहेर पडले. गंमत बघा, शिवसेना फुटल्यापासुन ठाकरे शिवसेनेचे अर्थात उद्धवजींचे सुपुत्र आदित्य रोज भाजपला शिव्या घालत टाहो फोडताना दिसतात. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी फुटली आणि रोहित अर्थात दादा हे देखील भाजपच्या नावाने टाहो फोडु लागले. दोन्हीही बाळ अवस्थेत म्हणावे लागतील. त्यांना त्यांच्या नेतृत्वाचे दोष दिसत नाहीत. मग आरोप थेट भाजपवर करू लागले. असे आरोप करणे म्हणजे विवाह झाल्यानंतर संतती होईना तेव्हा शेजार्‍यांच्या नावाने ओरडणे असंच म्हणावे लागेल. आदित्य असोत कि रोहित या दोन्ही बाळाने आपल्याच नेतृत्वाकडे पहात आत्मपरीक्षण करणे काळाची गरज.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागच्या वर्षी जुन महिन्यातच थेट गुवाहाटीला गेले. सोबत एक नव्हे तर 40 आमदार नंतरच्या घडामोडी सांगणे नको. पण शिवसेनेत मोठं बंड झालं. दुभंगल्या गेली आणि शिंदे गट बाजुला पडून राज्यात नविन सरकार अस्तित्वात आलं. अर्थात शिवसेना सोडताना त्यांनी आपण पक्ष सोडत नव्हे तर ज्यांनी हिंदुत्वाची साथ सोडली त्या उद्धवजी ठाकरे यांना वैतागुन पक्षाबाहेर पडल्याचं सांगितलं. ही सारी मंडळी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेली पण जे ठाकरेंचं स्वप्न होतं ते केवळ मुख्यमंत्री पदासाठी बाजुला ठेवल्या गेलं आणि राज्यात वेगळं समीकरण तयार झालं. भाजपाची साथ सोडु नये अशी भुमिका सुरूवातीपासुनच शिंदे गटाची होती. पण अनेकदा केवळ सत्तेसाठी स्वार्थाने नेतृत्व आंधळे होतात. मग धृतराष्ट्राच्या भुमिकेत जातात. तसंच काही म्हणावे लागेल. यापेक्षाही अधिक बाळासाहेबांच्या नंतर पक्ष सांभाळण्यात कुठेतरी स्वत: उद्धव ठाकरे कमी पडले हे आता लपुन राहिलं नाही. मग स्वत:ची राजकिय महत्वाकांक्षा म्हणा किंवा पक्ष चालवण्यासाठी अकार्यक्षमता म्हणा. अशा अनेक गोष्टी कारणीभुत ठरतात. अचानक लोक सोडून जातात. तेव्हा हा राजकिय बदल एखाद्या आठवड्याचा किंवा दिवसावर नसतो. अनेक वर्षे वेगवेगळे अनुभव पक्षात राहुन वेगवेगळा संघर्ष, कधी कधी अन्यायाची परिसीमा आणि मग जेव्हा नरडीला पाणी येतं तिथं स्वत:चा जीव वाचवण्यासाठी माकडीण देखील वाहत्या पुरात पिल्याला पायाखाली घेते आणि आपला जीव वाचवते. हे तत्व तथा उदाहरण इथे निश्चित लागु होतं. या सर्व त्रागातुन कदाचित एकनाथ शिंदे यांनी बंड केलं असावं.

तदनंतर शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं. शिवसेनेचे दोन गट पडले. कायद्याने देखील चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदेकडे आला. आता शिवसेना ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे या रूपाने वाटचाल सुरू आहे. एक वर्षे या पिक्चरला संपतो तिथंच राज्याच्या राजकारणात काल परवा राजकिय उलथापालथीने दुसरा नव्याने चित्रपट रिलीज झाला. राष्ट्रवादी पक्ष यांच्यात आकाशात वीज कडकडावी आणि उभ्या झाडाचे दोन तुकडे व्हावेत तसा दुभंगल्या गेला. ज्यातुन शरदचंद्रजी पवार मुळ संस्थापक असलेला राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षातुन बाहेर पडलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा राष्ट्रवादी पक्ष अर्थात 40 आमदार घेवुन दादा बाहेर पडले. चमत्कारीक सत्तेत येवुन बसले. स्वत: उपमुख्यमंत्री पदाची शपथ आणि एकुण 09 मंत्री नव्याने मंत्रीमंडळात आले. गंमत बघा, आपण बाहेर का पडलो? याची संपुर्ण कहाणी 45 मिनिटांच्या भाषणात अजितदादांनी मुंबईत बोलावलेल्या पक्षाच्या मेळाव्यात कथित केली. अर्थात त्यांच्या र्‍हदयात दाटलेले दु:ख ओठातुन बाहेर पडलं. त्यांची कौटुंबिक मुस्कटदाबी ज्यामुळे राजकिय अस्तित्वाला कशा प्रकारे दुर ठेवण्यात आलं? एवढेच नव्हे तर आम्हाला विलन बनवलं हे सांगायला ते मागे राहिले नाहीत. मुख्यमंत्री पदाची संधी आली असताना साहेबामुळे मिळाली नाही असं देखील ते सांगुन गेले.

एकुणच काय तर मोठ्या पवार साहेबांची राजकिय भुमिका आणि त्यांनी केलेलं तडजोडीचं राजकारण हा चाळीस वर्षाचा इतिहास त्यांनी जनतेच्या समोर मांडला. एक गोष्ट खरी आहे की राजकारणात कुठलाही पक्ष संधीची वाट पहातो आणि मग ती चालुन आली तर त्यावर हातोडा मारतो. तसंच म्हणावे लागेल. एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील पक्षांतर्गत संघर्षामुळे बाहेर पडले. पण काळाची गरज म्हणुन भाजपाने जवळ केलं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आपआपल्या नेतृत्वाला वैतागुन ही मंडळी सत्तेच्या सारीपाटावर जावुन बसली. कदाचित वैयक्तिक नशिबाचा भागही म्हणावा लागेल. पण शिवसेना सुपुत्र बाळ आदित्य तथा राष्ट्रवादी सुपुत्र बाळ रोहित या दोन्हीही लेकरांचा टाहो स्वत:च्या पितासमान नेतृत्वाच्या कुटिल डावपेचाकडे फोडताना दिसत नाही तर हे लेकरं भाजपच्या नावाने टाहो फोडणं म्हणजे स्वत: विवाहित पण जेव्हा संतती होईना तेव्हा शेजार्‍याच्या नावाने ओरडणं हीच उपमा द्यावी लागेल. वर्ष झालं आदित्य घसा ओरडुन भाजपला शिव्या घालतात आणि काल परवापासून रोहित दादा देखील भाजपाच्या नावाने ओरडायला लागले. या दोन्हीही लेकरांनी अगोदर स्वनेतृत्वाबद्दल आत्मपरीक्षण करण्याची गरज वाटते. राजकिय अनुभव मुळातच त्यांना कमी आपल्या पित्याच्या कर्माचे दिवस त्यांनी हिशोबात धरायला हवे. आदित्य ठाकरेंनी उद्धवजीमुळे शिवसेनेत काय झालं? आणि रोहित दादांनी मोठ्या साहेबांच्या भुमिकेमुळे आपल्या कुटुंबात असो कि पक्षात असो काय झालं? याचं आत्मपरीक्षण करायला हवं. एकेकाळी भाजप नेते स्व.गोपीनाथराव मुंडेंचं कुटुंब फोडताना कुणाचा सहभाग होता? हे मागे वळुन रोहित दादांनी पाहिलं तर मग आपल्या काकांनी कशाची पेरणी केली? जे आज महाराष्ट्राच्या राजकारणात उगवलं याचा थोडा इतिहास समजुन घ्यायला हवा. मोठे साहेब अर्थात पवार साहेबांनी लोकशाहीचं राजकारण करताना हीच लोकशाही पायदळी कशी तुडवली? मग स्व.वसंतदादा पाटील असतील किंवा अनेक असे राजकिय घराणे ज्या कुटुंबात हस्तक्षेप केल्याने नाती तुटली. हे पुण्यकर्म नव्हे तर फार मोठं पाप काका मंडळींनी केलं हे लेकरांनी लक्षात घ्यायला हवं.

आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) मागे वळुनच पहायला हवं की महाराष्ट्रात महायुतीची स्थापना स्व.बाळासाहेब ठाकरेंनी केली. हिंदुत्वाच्या लढाईसाठी आयुष्य घालवलं. मग हेच हिंदुत्व समुद्रात फेकुन एका रात्रीत केवळ मुख्यमंत्री पदासाठी तेही खा. संजय राऊत यांच्या मध्यस्थीने आपल्याला सिल्वर ओकचं पायपुसणं केलं. ही राजकिय गणितं लेकरांनी समजुन घ्यायला हवी. राजकारणात पक्ष कुठलाही असो सत्तेच्या राजकारणासाठी नेहमीच तो राजकिय तडजोडी तथा हिशोब लावतच असतो. काँग्रेस जेव्हा अनेक वर्षे सत्ता करत होती तेव्हा देखील केवळ सत्तेसाठी अनेक राज्यात काँग्रेस नेतृत्वाच्या हस्तक्षेपामुळे राजकिय उलथापालथी झालेला इतिहास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देश चालवताना सबका साथ सबका विकास केवळ विकासाचं राजकारण आणि त्यातुन सत्ताकारण ज्यामुळे काँग्रेसमुक्त देश झाला. आता काहीही घडो 2024नंतर या देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी 400 पार हॅटट्रीक केल्याशिवाय रहाणार नाही. कदाचित वय 83 होवुन देखील राजकारणाच्या चक्रव्युहातुन पायउतार व्हायला तयार नाहीत अशा नेतृत्वाला आपल्याच कर्माची फळे याचि देहि, याचि डोळा भोगावी लागतात. तेव्हा सत्तेच्या सारीपाटावर भाजप नेतृत्वाने टाकलेली गुगली विकेट घेण्याचा डाव असेल तर तिथं सत्तेचा विजय निश्चित असु शकतो ही सारी गणितं आदित्य आणि रोहित बाळांनी ओळखायला हवीत. अगोदर आपल्याच नेतृत्वासमोर जावुन तुमचं काय चुकलं? हे त्यांना विचारा आणि मग भाजपच्या नावाने आरडाओरड करा. एवढं केल्यानंतर खरंच बाळांनो तुमचे डोळे उघडतील हे मात्र नक्की.