राष्ट्रवादीने आघाडीतून बाहेर पडावे काय?, छगन भुजबळ यांचा राऊत यांना संतप्त सवाल 

मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांना आपला वारस तयार करता आला नाही. त्यात ते अपयशी ठरले आहेत, असं दैनिक ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.दरम्यान, यामुळे महाविकास आघाडीत आणखी तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपची पोटदुखी अशी की शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा त्यांचा प्लॅन होता. लोक बॅगा भरुन तयारच होते. येणाऱ्यांच्या लॉजिंग-बोर्डिंगची व्यवस्था पूर्ण झाल्याचेही बोलले जात होते. मात्र पवारांच्या खेळीने भाजपचा प्लॅन कचऱ्याच्या टोपलीत गेला.असा दावा देखील सामनामध्ये करण्यात आला आहे.

दुसऱ्या बाजूला या अग्रलेखावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संजय राऊतांना चांगलेच झापले आहे. भुजबळ म्हणाले, शरद पवारांनी लोक माझे सांगाती पुस्तकात जे म्हटलंय त्यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते. परंतु संजय राऊतांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे, त्यांना काय अडचण आहे? त्यांना अस वाटतं का, की राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे.

संजय राऊतांचं जेवढं आयुष्य आहे, तेवढं शरद पवारांचं राजकारण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील असे नेतृत्व करणारे नेते आहेत.अस म्हणत भुजबळ यांनी संजय राऊत यांची चांगलीच धुलाई केली आहे.