Siddaramaiah : कर्नाटकात काँग्रेसने प्रचंड बहुमताने विजय मिळवला. त्यानंतर चार दिवस मुख्यमंत्र्यांच्या नावावरून गदारोळ सुरूच होता. बराच विचारविनिमय केल्यानंतर आता सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजत आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत काँग्रेसकडून डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या ही नावे शर्यतीत आघाडीवर होती. आता अखेर सिद्धरामय्या यांची काँग्रेसकडून निवड करण्यात आली असून ते 20 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. शेवटच्या क्षणी डीके शिवकुमार यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची खुर्ची खेचून घेणारे सिद्धरामय्या कोण आहेत, याची चर्चा आहे.
कोण आहेत सिद्धरामय्या?
सिद्धरामय्या हे कर्नाटकातील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. म्हैसूर जिल्ह्यातील एका गावात जन्मलेले सिद्धरामय्या हे व्यवसायाने वकील होते आणि त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सिद्धरामय्या यांनी आधी बीएस्सी आणि नंतर कायद्याचे शिक्षण घेतले. सिद्धरामय्या यांच्या आई-वडिलांची त्यांनी डॉक्टर व्हावे अशी इच्छा होती. तरी त्यांनी कायद्याची निवड केली. कायदा सोडल्यानंतर सिद्धरामय्या यांनी राजकारणात प्रवेश केला.
राजकीय कारकीर्द कशी होती?
सिद्धरामय्या 1983 मध्ये कर्नाटकातील चामुंडेश्वरी मतदारसंघातून निवडून येऊन पहिल्यांदा विधानसभेत आले. 1994 मध्ये जनता दल सरकारमध्ये राहून ते कर्नाटकचे उपमुख्यमंत्रीही झाले. एचडी देवेगौडा यांच्याशी झालेल्या वादानंतर जनता दल सेक्युलर सोडले आणि 2008 मध्ये काँग्रेसशी हातमिळवणी केली. 2013 ते 2018 पर्यंत ते कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी आतापर्यंत 12 निवडणुका लढवल्या असून त्यापैकी नऊ त्यांनी जिंकल्या आहेत.
सिद्धरामय्या यांच्याकडे 19 कोटी रुपयांची संपत्ती आहे
सिद्धरामय्या यांच्या मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या नामांकनासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सिद्धरामय्या यांच्याकडे 19 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. सिद्धरामय्या यांच्याकडे 9.58 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. आणि 9.43 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यासोबतच सिद्धरामय्या यांच्यावर 13 खटले प्रलंबित आहेत.