खाजगी कंपनीमार्फत परीक्षा घेण्याचा अट्टाहास म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार

मुंबई : सरकारच्या भोंगळ कारभाराचा प्रत्यय राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आला आहे. कारण म्हाडाच्या परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे. काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडाच्या व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा जानेवारीमध्ये होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाडांची मध्यरात्री ट्वीट करत म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे अशी घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांची क्षमा मागत त्यांनी ही माहिती दिली असून याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर या प्रकरणी युक्रांद पुणे शहर उपाध्यक्ष कमलाकर शेटे यांनी अत्यंत मार्मिक अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अचानक म्हाडाची आजची परीक्षा रद्द रद्द करण्यात आली आहे, याबाबत गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आजपहाटे दोन वाजता सांगितले आहे. यापूर्वीही आरोग्य विभागाची परीक्षा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ऐनवेळी पुढे ढकलली होती. मागील आरोग्यभरती मधील अनुभव असताना अशा प्रकारे अचानक परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांना नाहक त्रास दिला जातो आहे. लांब अंतरावर प्रवास करून वेळ, पैसा खर्च करून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

आरोग्यभरतीचे पेपर फोडण्यात आले होते तेव्हाही सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो की गैरप्रकार झालेले आहेत. आताही म्हाडाच्या होणाऱ्या परीक्षेत घोटाळा करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मा. राज्यपाल महोदयांना भेटून चर्चा करून परीक्षा रद्द करून SIT मार्फ़त चौकशी करून सर्व परीक्षा MPSC मार्फत घ्याव्यात अशी मागणी युक्रांद आणि MPSC समन्वय समिती मार्फ़त केली होती. वारंवार असे गैरप्रकार होत असताना MPSC मार्फत परीक्षा घ्यायला राज्य शासनाला अडचण काय आहे. खाजगी कंपनीमार्फत परीक्षा घेण्याचा अट्टाहास म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार आहे.