…म्हणून रतन टाटा यांच्यासारखी भारतीयांच्या हृदयात स्थान मिळवलेला दुसरा कोणताही उद्योगपती नसेल

विनीत वर्तक – २१ जानेवारी २००७ ला दिल्ली च्या कार एक्स्पो मध्ये टाटा नॅनो च अनावरण करताना भावनिक होऊन रतन टाटा (Ratan Tata) म्हणाले होते, “A Promise is a Promise” पावसाळ्यात स्कुटर वरून आपल्या कुटुंबाला नेताना एका माणसाला बघून रतन टाटा मनातून अस्वस्थ झाले. प्रगतीच्या वाटेवर असणाऱ्या भारतातील आज अशी अनेक कुटुंब आहेत जी सुरक्षितरित्या प्रवास करू शकत नाहीत. रतन टाटा ह्यांनी मनातून ठरवलं की आपण अश्या लोकांसाठी काय करू शकतो? त्यांनी ठरवलं की आपण अशी कार बनवायची की जी भारतातील मध्यमवर्ग खरेदी करू शकेल. १ लाखात कार देण्याचं आपलं वचन त्यांनी प्रत्यक्षात उतरवलं ते फक्त आणि फक्त भारतीयांसाठी.

टाटा नॅनो ने टाटा ला कधीच फायदा दिला नाही ( २०१९ मध्ये टाटा नॅनो ची एकही कार ऑर्डर नसल्यामुळे तयार केली गेली नाही.) उलट टाटा ग्रुप ला ह्या प्रकल्पामुळे खूप नुकसान उचलावं लागलं पण रतन टाटा ह्यांनी आपला दिलेला शब्द पाळला. १९९८ मध्ये रतन टाटा नी भारतात ‘इंडिका’ कार आणली. पण ही कार लोकांच्या पसंतीस उतरली नाही. कार क्षेत्रातून टाटा नी मागे फिरावं हा सल्ला अनेकांनी रतन टाटांना दिला. हा सल्ला ऐकून रतन टाटा अमेरीकेतील डेट्रॉईट इकडे आपली कंपनी विकण्यासाठी अमेरीकेच्या फोर्ड कंपनीच्या मुख्यालयात गेले होते. ह्या मिटिंग मध्ये फोर्ड चे अध्यक्ष बिल फोर्ड (Bill Ford) ह्यांनी रतन टाटांचा अपमान केला. बिल फोर्ड म्हणाले होते, तुम्हाला ह्या कार बिझनेस मधलं कळत नसताना कशाला ह्यात उतरतात, ही कंपनी जर आम्ही विकत घेतली तर आम्ही तुमच्यावर उपकार करू. बिल फोर्ड ह्यांचे शब्द रतन टाटांना खुप लागले. भारतात परतल्यावर त्यांनी इंडिका विक्रीचा आपला विचार रद्द केला आणि इंडिका ला भारतीय बाजारपेठेत स्थान मिळवून दिलं.

रतन टाटांनी आपली कंपनी न विकता लहान गाड्यांच्या उत्पादनात खुप मोठी मजल मारली. बरोबर दहा वर्षानंतर काळाचे फासे उलटे पडले. २००८ साली आता फोर्ड कंपनी आर्थिक गटांगळ्या खात होती. टाटा ग्रुप ने त्यांचे जॅग्वार आणि लँड रोव्हर (Jaguar and Land Rover) हे ब्रँड खरेदी करण्यात उत्सुकता दाखवली. फोर्ड कंपनीला पैश्याची प्रचंड गरज होती. आता तेच बिल फोर्ड अमेरीकेतून मुंबईत ‘बॉम्बे हाऊस’ ह्या टाटा ग्रुप च्या मुख्यालयात आपली कंपनी विकण्यासाठी दाखल झाले. टाटा ग्रुप ने जगात अतिशय नावाजलेले आणि प्रतिष्ठा असणारे जॅग्वार आणि लँड रोव्हर हे ब्रँड तब्बल २.३ बिलियन अमेरीकन डॉलर ( ९३०० कोटी रुपये) देऊन खरेदी केले. बिल फोर्ड ह्यांनी जरी आपली पायरी सोडली असली तरी रतन टाटांनी आपली पायरी एक पाऊल उंचावर नेताना त्यांचा अपमान केला नाही. रतन टाटांनी न बोलता बिल फोर्ड ह्यांनी केलेल्या अपमानाचा बदला आपल्या कृतीतून घेतला. त्या वेळेस बिल फोर्ड रतन टाटांना म्हणाले होते, आज जॅग्वार आणि लँड रोव्हर हे ब्रँड विकत घेऊन तुम्ही आमच्यावर उपकार केले.

एकेकाळी ब्रिटिशांनी आपला चहा जगभर नेला. चहाची ओढ पूर्ण जगाला लावणाऱ्या ह्या चहाच्या निर्मितीची सूत्र ब्रिटिशांकडे होती. टेटली हा ब्रँड युरोप ,कॅनडा  प्रथम क्रमांकाचा तर अमेरीकेत दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड होता. भारताला एकेकाळी हिणवणाऱ्या ब्रिटिशांच्या हातातून टाटा ग्रुप ने तब्बल २७१ मिलियन पौंड मोजत २००० साली ह्या ग्रुप ची मालकी आपल्याकडे घेतली.

आज टाटा ग्लोबल बेव्हरेजेस जगातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. २००७ मध्ये टाटा स्टील ही जगात स्टील चं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये ५६ व्या स्थानावर होती. आपल्यापेक्षा ४ पट मोठ्या असणाऱ्या डच कंपनी ‘कोरस’ ला टाटा ग्रुप ने ८.१ मिलियन डॉलर ला खरेदी केलं.

संपुर्ण भारताच्या जेवणाला चव आणणाऱ्या आयोडीन युक्त मिठाची सुरवात टाटांनी केली. भारतातील मिठाची उलाढाल २२ बिलियन रुपयांची आहे. त्यातील १७% हिस्सा टाटांचा आहे.

ज्या वेळेस कॉम्प्यूटर ची पायमुळ भारतात रोवली नव्हती त्यावेळेस १९६८ साली टी. सी. एस. ची स्थापना टाटांनी केली. आज जगातील पहिल्या ४ आय. टी. कंपन्यांमध्ये तिची गणना होते. ३.५ लाखापेक्षा जास्त कर्मचारी आणि ८० बिलियन डॉलर इतक मार्केट कॅपिटल असणारी टी. सी. एस. भारतातील अग्रणी आय.टी. कंपनी आहे.

वय वर्ष २१ ज्या काळात एका नवीन स्वप्नांची सुरवात होते त्या काळात रतन टाटा ह्यांच्या खांद्यावर टाटा ग्रुप ची जबाबदारी आली. पुढल्या अडीच दशकात रतन टाटा नी टाटा ग्रुप च नाव फक्त भारतापुरता मर्यादित ठेवलं नाही तर त्याला जागतिक बनवलं. रतन टाटा ह्यांनी जगातील नावाजलेले ब्रँड टाटा ग्रुप च्या पंखाखाली आणले आहेत. ज्यामध्ये टेटली, जॅग्वार, लँड रोव्हर, कोरस अश्या जगातील नावाजलेल्या ब्रँड चा समावेश आहे. त्यांच्या हाताखाली टाटा ग्रुप चा नफा तब्बल ५०% नी वाढला. आज टाटा ग्रुप कंपनीची उलाढाल १०६ बिलियन अमेरीकन डॉलर च्या घरात आहे. टाटा ग्रुप मध्ये सद्य घडीला ७ लाख ५० हजार पेक्षा जास्ती लोक जगभर काम करतात. मिठापासून ते कॉम्प्युटर आणि हॉटेल पासून ते कार पर्यंत प्रत्येक क्षेत्रात टाटांचा दबदबा आहे. धंदा करून नुसता नफा न मिळवता आपल्या कर्तृत्वाने रतन टाटांनी टाटा ह्या शब्दाला वजन प्राप्त करून दिलं आहे. आज अब्जावधी रुपयांच साम्राज्य असताना सुद्धा रतन टाटांनी जोडलेली माणसं आणि विश्वास टाटा ब्रँड ला एक वेगळं वलय प्राप्त करून देतो. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर, “I have tried to treat all people equally. Whether it’s a poor person on the street or a kid selling magazines as against a millionaire or a billionaire, I talk to them and treat them all the same way. I’m aware that I do that, and I do that not for show, but because of the feeling that I think everyone deserves recognition as a human being.”TIFR, Tata Memorial Hospital, TISS, IIS ह्या आणि अश्या अनेक संस्था टाटानी स्थापन केलेल्या आहेत. ज्यांचा आजचा भारत घडवण्यात खुप मोठं  योगदान आहे. ३०,००० पेक्षा जास्ती रुग्ण प्रत्येक वर्षी टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये कॅन्सर वर उपचार घेतात. ह्यातील तब्बल ७०% रुग्णांवर फुकट उपचार केले जातात.

टाटा कंपन्यांची जवळपास ६६% मालकीहक्क हा वेगवेगळ्या ट्रस्ट कडे आहे. टाटांना होणाऱ्या वार्षिक ७ बिलियन अमेरिकन डॉलर चा फायदा हा ह्याच ट्रस्ट मार्फत भारताच्या कल्याणासाठी वापरला जातो. आज भारत कोरोना शी लढा देताना चाचपडत असताना रतन टाटा आणि टाटा ग्रुप पुन्हा एकदा भारतीयांसाठी भक्कमपणे उभा राहिला आहे. टाटा ग्रुप ने सगळ्यात आधी १५०० कोटी रुपयांची मदत कोरोना शी लढण्यासाठी भारतीयांना दिलेली आहे.रतन टाटा आज निवृत्त झाले असले तरी भारत आणि भारतीयांच्या बुद्धिमत्तेला उंच भरारी घेण्यासाठी मदत करण्यात सगळ्यात पुढे आहेत. जवळपास २४ स्टार्ट अप व्यवसायांना उभं राहण्यासाठी रतन टाटांनी मदत केली आहे. काहीतरी नवीन आणि जगावेगळं करण्यासाठी आसुसलेल्या अनेक कल्पनांना रतन टाटा आपल्या परीने उडण्यासाठी पंखांच बळ देत आहेत. माणूस श्रीमंत होतो तो पैसे कमावून पण मनाची श्रीमंती पैश्याने विकत घेता येतं नाही. ती आपल्या कर्तृत्वातून कमवावी लागते आणि माझ्या मते रतन टाटा सारखं भारतीयांच्या मनाची श्रीमंती कमावलेला दुसरा कोणता उद्योगपती नसेल.  २००० साली पदमभूषण तर २००८ साली पदमविभूषण देऊन भारत सरकारने त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला आहे. माझ्या मते भारताचा सर्वोच्च सन्मान रतन टाटा ह्यांना दिला तर त्या सन्मानाचा गौरव होईल इतकं मोठं कर्तृत्व रतन टाटा ह्यांच आहे. “I dream of an India that would be an equal opportunity country – a country where we diminish the disparity between the rich and the poor and, most importantly, give an opportunity to anyone to succeed as long as they have the willingness and endurance to do so.” – Ratan Tata

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे