गळ्यात रुद्राक्ष, पारंपारिक धोती अन् गमजा; विराट कोहली पोहोचला ‘महाकाल’च्या दरबारात

उज्जैन- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात सध्या ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. या मालिकेतील तिसरा सामना इंदोर येथे झाला. या सामन्यातील पराभवानंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने पत्नी अनुष्का शर्मासह (Anushka Sharma) उज्जैन येथे महाकालचे दर्शन घेतले आहे. दोघांचे मंदिरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

इंदोरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर आणि चौथ्या कसोटीपूर्वी विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासोबत महाकालचे दर्शन घेतले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा गुलाबी रंगाच्या साडीत तर विराट कोहली पारंपारिक धोती आणि गमजामध्ये दिसत आहे. तसेच त्याच्या गळ्यात रुद्राक्ष दिसत आहे.

महाकालच्या दरबारात जाण्यासाठी महिलांना साडी आणि पुरुषांना धोतर आणि गमजा घालावा लागतो. पहाटे ४ वाजता होणाऱ्या महाकालच्या भस्म आरतीलाही अनुष्का आणि विराटने हजेरी लावली. तत्पूर्वी, अनुष्का आणि विराटने स्वामी दयानंद आश्रमात आयोजित विधीला हजेरी लावली होती.